सावरदरीतील दोन तरुणांचा खून; आरोपी फरार | पुढारी

सावरदरीतील दोन तरुणांचा खून; आरोपी फरार

चाकण; पुढारी वृत्तसेवा: चाकण एमआयडीसीमधील सावरदरी (ता. खेड) येथे छेडछाड व संशयातून दोन तरुणांचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला. सुरज नंदकुमार चव्हाण (वय 27) व अनिकेत किसन पवार (वय 24, दोघेही सध्या रा. सावरदरी) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्नाली सूरज चव्हाण (वय 29, सध्या रा. सावरदरी, मूळ रा. जि. सातारा) यांनी महाळुंगे पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रदीप दिलीप भगत (सध्या रा. सावरदरी, मूळ रा. वाशीम) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. 8) सायंकाळी सावरदरी गावातील भक्ती अपार्टमेंटजवळ यातील प्रमुख संशयित आरोपी प्रदीप दिलीप भगत फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणार्‍या एका महिलेची छेड काढून तिला वारंवार त्रास देत होता. तसेच, संबंधित महिलेच्या घराच्या स्नानगृहाच्या खिडकीची काच फोडल्याच्या संशयातून फिर्यादी महिलेचे पती सूरज चव्हाण (वय 27) व त्यांचा मित्र अनिकेत पवार (वय 24) दोघे आरोपीस जाब विचारण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला.

आरोपी प्रदीप भगत याने सूरज आणि अनिकेत या दोघांच्या पोटावर धारदार सुर्‍याने सपासप वार करून जखमी केले. या दोघांना स्थानिकांनी तत्काळ चाकण आणि तळेगाव येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. महाळुंगे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली.

 

Back to top button