पुणे : रस्त्यावर खासगी वाहनांचा लोंढा वाढतोय; पाच वर्षांत 10 लाख वाहनांमध्ये वाढ | पुढारी

पुणे : रस्त्यावर खासगी वाहनांचा लोंढा वाढतोय; पाच वर्षांत 10 लाख वाहनांमध्ये वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडलेली असल्याने खासगी वाहनांच्या संख्येत अजस्त्र वाढ झाली अन् त्यामुळे पुण्यातील वाहतूक समस्या गंभीर बनल्याचे सर्वश्रुत आहेच; पण गेल्या पाच वर्षांत या प्रश्नाने आणखी उग्र रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील वाहनांची संख्या 43 लाखांवर गेली असून, त्यातील तब्बल दहा लाख वाहने केवळ गेल्या पाच वर्षांत रस्त्यावर आली आहेत.

महाराष्ट्राची स्थापना 1960 मध्ये झाली, तेव्हा पुणे हे शहर पेठांपुरते मर्यादित होते. छोट्या बोळीतून बैलगाडी, टांगा, सायकल हीच प्रवासाची साधने होती. एकेकाळी देशात सर्वाधिक सायकली असणारे शहर म्हणून पुण्याचे नाव घेतले जाई. सायकलवर जाणार्‍या महिला देशात प्रथम पुण्यात दिसू लागल्या. सायकलची प्रचंड विक्री सुरू झाली. 1980 नंतर बजाज, टाटा, महिंद्रा, कायनॅटिक यांसारख्या कंपन्यांनी पुण्यात वाहन क्रांती आणली.

कायनॅटिक कंपनीने तयार केलेल्या 1 लाख लुनाची विक्री पुण्यात झाली. या घटनेने देशात क्रांती झाली. ‘चल मेरी लुना’ला पुणेकरांनी उचलून धरले, ही गोष्ट आहे 1968 ते 1980 सालापर्यंतची. त्यानंतर आता सर्वाधिक दुचाकी पुण्यात वाढल्या आहेत. पुण्यात चारचाकींपेक्षा अधिक दुचाकींची संख्या आहे.

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करणे, हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांपासून जाणकार लोकप्रतिनिधींपर्यंतचे सर्वच घटक एकमुखाने सांगतात. प्रत्यक्षात मात्र वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी योजण्यात येणारे उपाय मात्र खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देणारे असेच असल्याचे दिसून येते. रस्ते रुंद करणे, पादचार्‍यांसाठी आवश्यक असलेल्या फुटपाथची रुंदी कमी करणे, नवे रस्ते आखणे आणि सर्वांत घातक म्हणजे वाहनांची भूक कधीच न भागविता येणारे मोठमोठे उड्डाणपूल बांधणे, अशा योजना ’उपाय’ या सदरातून केले जातात.

वास्तविक, या कोणत्याच कथित उपायांनी वाहतुकीची समस्या सुटत नाही, तर त्यामुळे रस्त्यावर अधिकाधिक वाहने ओतली जातात. याचाच परिणाम म्हणून खासगी वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्थाा चांगली नसल्याने खासगी वाहने वाढली आणि त्यातून वाहतूक कोंडी, प्रदूषण आदी समस्या उभ्या ठाकल्या.

खासगी वाहनांची वाढ होण्याचे हे प्रमाण गेल्या पाच वर्षांत कमालीचे वाढले आहे. 43 लाख वाहनांपैकी दहा लाख वाहने केवळ पाचच वर्षांत रस्त्यावर आली आहेत. यापुढेही खासगी वाहने वाढण्याचा हा वेग आणखी वाढण्याचा धोका आहे. पुणे शहराचा गौरव गेल्या दशकात देशातील सर्वाधिक राहण्यासारखे शहर म्हणून केंद्र सरकारने केला. पण, यापुढील काळात शहराची अवस्था राहता न येण्यासारखे शहर म्हणून होण्याची दाट शक्यता आहे.

पुण्यात अशी झाली वाहनांमध्ये पाच वर्षांत वाढ…

अक्र. सन/वर्ष त्या वर्षातील वाहनांची संख्या
1) 2018 2 लाख 73 हजार 077
2) 2019 2 लाख 41 हजार 562
3) 2020 1 लाख 50 हजार 111
4) 2021 1 लाख 67 हजार 947
5) 2022 1 लाख 76 हजार 367
पाच वर्षांतील एकूण वाहनसंख्या 10 लाख 11 हजार 64
(स्रोत ः परिवहन संकेतस्थळ)

स्रोत : पुणे आरटीओ

दुचाकी – 31 लाख 74 लाख 645
मोटारकार – 7 लाख 71 हजार 128
टॅक्सी कॅब – 38 हजार 401
रिक्षा – 85 हजार 942
स्कूल बस – 3 हजार 303
रुग्णवाहिका – 1 हजार 575
ट्रक – 42 हजार 581
टँकर – 5 हजार 273
ट्रॅक्टर – 31 हजार 267
ट्रेलर – 13 हजार 48
डिलिव्हरी व्हॅन (चारचाकी) – 63 हजार 166
डिलिव्हरी व्हॅन (तीनचाकी) – 39 हजार 518
प्रायव्हेट सर्व्हिस व्हेईकल – 1 हजार 419
अन्य – 85 हजार 03
शहरातील एकूण – 43 लाख 7 हजार 831 वाहने

 

Back to top button