वेल्हे : पुनर्वसनाअभावी गुंजवणी धरणग्रस्त हलाखीत : आ. संग्राम थोपटे | पुढारी

वेल्हे : पुनर्वसनाअभावी गुंजवणी धरणग्रस्त हलाखीत : आ. संग्राम थोपटे

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: गुंजवणी धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेक धरणग्रस्तांना योग्य पुनर्वसनाअभावी हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, वांगणी उपसा सिंचन प्रकल्पात वांगणीवाडी, कोळवडी गावांचा समावेश नाही. स्थानिक शेतकर्‍यांना विश्वासात न घेता बंदिस्त पाइपलाइनबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी वेल्हे येथील समन्वय समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. माजी मंत्र्यांच्या अट्टहासाने जलसंपदा विभागाने गुंजवणी प्रकल्पातील अनेक कामे चुकीच्या पद्धतीची केल्याचा आरोप आमदार थोपटे यांनी केला.

आमदार थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 4) वेल्हे तालुका पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे, निरा देवधर जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, गटविकास अधिकारी पंकज शेळके, माजी सभापती दिनकर सरपाले, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत, गणपत देवगिरीकर, संदीप नगिने, शोभा जाधव, युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत म्हणाले की, शंभराहून अधिक गुंजवणी धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. जिल्हा पुनर्वसन अधिकारी, महसूल विभाग शेतकर्‍यांना दाद देत नाही. धरणग्रस्त समितीचे संघटक गणपत देवगिरीकर म्हणाले की, धरणासाठी जमिनी, घरे-दारे देऊन धरणग्रस्तांनी त्याग केला. मात्र, सरकारने अनेक धरणग्रस्तांना वार्‍यावर सोडले आहे.

मार्गासनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे, वांगणीचे उपसरपंच शिवाजी चोरघे आदींनी विविध समस्या मांडल्या. वेल्हे-नसरापूर-चेलाडी रस्ता, वेल्हे येथील बहुचर्चित प्रशासकीय इमारत, ग्राम न्यायालय, करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील आरोग्यसेवेतील त्रुटी, पंचायत समिती विभाग, एसटी, महावितरण, पोलिस विभागाच्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला.

Back to top button