बिबवेवाडी : ‘महाबीज’समोर साचला कचर्‍याचा ढीग | पुढारी

बिबवेवाडी : ‘महाबीज’समोर साचला कचर्‍याचा ढीग

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: मार्केट यार्ड परिसरातील पणन महामंडळाच्या समोरील राष्ट्रीय महाबीजच्या कार्यालय व गोडाऊनसमोरील भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. येथील स्थानिक नागरिकांसह ‘महाबीज’च्या कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हा परिसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकार क्षेत्रात येतो, त्यामुळे येथील विविध देखभाल दुरुस्तीचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समिती करते.

मात्र, परिसराची स्वच्छता पुणे महानगरपालिकेचे बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी करतात व कचरा उचलतात. परंतु महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी- कर्मचार्‍यांच्या समन्वयाच्या अभावामुळे येथील कचरा बरेच दिवस पडून आहे. परिणामी त्याचा त्रास या सर्वच घटकांना होत आहे. कधी महापालिकेची गाडी येते तर कधी कृषी उत्पन्न बाजार समितीची गाडी येते. पण दोन्ही ठिकाणाहून कचरा न उचलला गेल्यामुळे आणि समस्या काळात नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे.

Back to top button