ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येऊन गंजपेठेत दुर्गंधी | पुढारी

ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येऊन गंजपेठेत दुर्गंधी

भवानी पेठ; पुढारी वृत्तसेवा: महात्मा फुले गंज पेठ हा दाट लोकवस्तीचा असून, येथील अंतर्गत अरुंद रस्त्यावरील विविध विकासकामे अपूर्ण आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उघड्यावरील ड्रेनेज व चेंबरवाहिनीतून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था आहे. तसेच पावसाळी वाहिनीची कामे नीट न झाल्याने थोडासा जरी पाऊस झाला तरी पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे.

‘633, या लोकवस्तीत मोलमजुरी करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. सुमारे चार हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न धोक्यात आला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. या भागातील विकास निधी खासगी सोसायटींना वापरण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे, याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे,’ असे देवा देवकुळे यांनी सांगितले.

शुद्ध पाण्याचा अभाव
गंज पेठेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. काही भागात कमी दाबाने तर काही भागात उच्च दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या ड्रेनेज लाईनमधून गेल्यानेही नागरिकांना दूषित पाण्याचा संकटाला सामोरे जावे लागते. वारंवार तक्रारीनंतरही विकासकामे पूर्ण केली जात नाहीत.

 

Back to top button