पिंपरी : ‘गरीब कल्याण’ची मुदतवाढ कागदावरच ! स्थानिक परिमंडळास आदेश प्राप्त न झाल्याने सव्वातीन लाख लाभार्थी धान्यापासून वंचित | पुढारी

पिंपरी : ‘गरीब कल्याण’ची मुदतवाढ कागदावरच ! स्थानिक परिमंडळास आदेश प्राप्त न झाल्याने सव्वातीन लाख लाभार्थी धान्यापासून वंचित

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला केंद्राने आणखी तीन महिने (डिसेंबर 2022) पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र याबाबतचा आदेश स्थानिक परिमंडळ कार्यालयास प्राप्त झालेला नाही, त्यामुळे तूर्त तरी शहरातील सव्वातीन लाख लाभार्थी लाभापासून वंचित राहणार आहेत.

योजनेमुळे सामान्यांना आधार : 
समाजातील गरीब, दुर्बल घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2020 पासून सुरू झाली. कोरोनाचे काळात उद्योग, व्यवसाय अडचणीत आले. अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. त्या प्रतिकूल परिस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेने सामान्य माणसाला काहीसा आधार मिळाला.

मुदतवाढ दिली; मात्र आदेशच मिळाला नाही
कोरोना नियंत्रणात आला असला, देशभरात सर्व आर्थिक व्यवहारांनाही गती मिळाली असली, तरी आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळात कोणतेही गरीब कुटुंब उपाशी राहू नये, यासाठी या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली. याआधी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ती सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत योजनेला मुदतवाढ दिली आहे; मात्र अजून हा आदेश खालपर्यंत पोचल्याचे दिसत नाही.

अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेचा गरीब कल्याण योजनेत समावेश आहे. गरीब कल्याण योजनेची मुदत तीन महिने वाढविण्यात आल्याने लाभार्थी काहीसे आनंदले आहेत; मात्र या योजनेला मुदतवाढ मिळाल्याचे पत्र अद्याप पिंपरी-चिंचवड परिमंडळला मिळाले नसल्याने लाभार्थ्यांना तूर्त तरी थांबावे लागणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला केंद्र सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे; पण अद्याप याबाबतचे पत्र परिमंडळ कार्यालयास प्राप्त झालेले नाही. आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी केली जाईल व धान्य वाटप केले जाईल.
                                         – दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी

Back to top button