हल्ल्यातील फरारी आरोपी जेरबंद; खेड टोलनाका येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

हल्ल्यातील फरारी आरोपी जेरबंद; खेड टोलनाका येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मंचर; पुढारी वृत्तसेवा: पेठ येथील हॉटेल व्यावसायिक संतोष बबन धुमाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करून फरारी झालेल्या सोमनाथ वसंत माठे (वय 23) आणि रितेश विजय नेटके (वय 23, दोघे रा. पेठ, ता. आंबेगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने खेड टोलनाका येथून शनिवारी (दि. 1) दुपारी अटक केली.

पेठ येथील प्रतीक रामदास धुमाळ व चेतन बबन गुंजाळ यांचे मोटारसायकलला कट मारल्याचे कारणावरून झालेली भांडणे सोडविण्यास संतोष धुमाळ गेले होते. यातील आरोपी सोमनाथ माटे याने संतोष धुमाळ यांच्या डोक्यात दगड मारून त्यास जखमी केले होते.

त्यांना वाचविण्यासाठी प्रेम धुमाळ व अक्षय धुमाळ हे मध्ये आले असता, त्याचे इतर 5 ते 6 साथीदारांपैकी एकाने अक्षय धुमाळ याचे डोक्यात कोयत्याने वार करून त्यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने जखमी करून ते तेथून पळून गेले होते. याबाबत सात जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विक्रम तापकीर यांना गोपनीय माहिती मिळाली, की या गुन्ह्यातील दोन आरोपी हे पुणे-नाशिक महामार्गाने पुणे येथे पळून जात आहेत. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमनाथ माठे आणि रितेश नेटके या दोघांना ताब्यात घेतले आहे.

Back to top button