भोर : बांधकाम विभागाला खड्डे बुजवण्याचे आदेश : आमदार संग्राम थोपटे | पुढारी

भोर : बांधकाम विभागाला खड्डे बुजवण्याचे आदेश : आमदार संग्राम थोपटे

भोर; पुढारी वृत्तसेवा: भोर-वेल्हे व मुळशी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येणार्‍या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यावरील या वर्षात अतिवृष्टीमुळे पडलेले खड्डे बुजविण्याचे काम लवकरच हाती घ्यावे, असे आदेश दिले असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आ. थोपटे यांनी सांगितले, की कापूरहोळ मोर ते मांढरदेवी राज्यमार्ग क्रमांक 119 यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. यापूर्वी दोन वेळा खड्डे बुजविण्यात आले होते.

परंतु, नंतर पडलेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आल्या आहेत. या रस्त्यासाठी एशियन विकास बँकेतर्गत रक्कम 340 कोटी रुपये मंजूर असून, रस्त्याची कामे दिवाळीनंतर हाती घेण्यात येत आहेत. हा रस्ता कापूरहोळ ते भोर आणि मांढरदेवी असा 10 मीटर रुंदीकरणासह कँाक्रेटीकरण होणार आहे. या कामाची निविदाप्रक्रिया प्रगतीत आहे. लवकरच या कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त होईल.

Back to top button