पुणे : मुलाकडून आईच्या खुनाचा प्रयत्न | पुढारी

पुणे : मुलाकडून आईच्या खुनाचा प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दारूसाठी आपल्या आईवरच चाकूने हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कदमवाक वस्तीत घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अभिजित गोपीचंद दरेकर (वय 32, रा. बालाजी हाईटस, संभाजीनगर, कदमवाकवस्ती) याला अटक केली आहे. याबाबत सिंधू गोपीचंद दरेकर (वय 50, रा. कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि.28) सायंकाळी सव्वासात वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजितला दारूचे व्यसन असून तो काही कामधंदा करीत नाही. बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता तो त्यांच्या घरी आला. फिर्यादी व त्यांची सून मनीषा यांना शिवीगाळ केली. देवघरातील चाकू घेऊन त्याने आपल्याच आईच्या डोक्यात वार केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

Back to top button