कळंब परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, पिके पाण्यात; शेतकरी त्रस्त | पुढारी

कळंब परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, पिके पाण्यात; शेतकरी त्रस्त

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: कळंब, लौकी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 29) सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पालेभाज्यावर्गीय पिके पाण्यात होती. मागील दोन दिवसांपासून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पडत आहे. गुरुवारी झालेला ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत.

या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. अनेक विहिरी तुडुंब भरल्या आहेत, तर रस्त्यालगत असलेल्या गटारांमध्ये पाणी साठत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. शेताचे बांध अनेक ठिकाणी फुटले. सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी रोपे तयार करता येत नसल्याने हंगाम वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. कळंब येथील पर्जन्यमापकात किती पाऊस झाला याची नोंद महसूल विभागाकडून प्राप्त झाली नाही.

 

Back to top button