[author title="राजेंद्र उट्टलवार" image="http://"][/author]
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भातच नव्हे तर देशात प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. अद्याप त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, तिसऱ्यांदा विजयासोबतच संसदेत जाण्याच्या दृष्टीने त्यांची निर्णायक विजयी घोडदौड सुरू आहे. मंगळवारी (दि.४) सायंकाळी साडेपाचपर्यंत जाहीर झालेल्या १६ व्या फेरी अखेरीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे एक लाख 7 हजार मतांची आघाडी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यावर घेतली आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात एकंदर २६ उमेदवार रिंगणात असले, तरी भाजप-काँग्रेस अशी थेट लढत सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस उमेदवार ठाकरे यांना पाठिंबा दिला होता तर बसपाचे योगेश लांजेवार यांची उमेदवारी आजवरचा अनुभव लक्षात घेता फारशी प्रभावी ठरली नाही. नाना पटोले यांना मिळालेल्या मतांपेक्षा ठाकरे सरस ठरले. आज सकाळी आठ वाजता कळमना मतमोजणी केंद्रावर मत मोजणी सुरू झाल्यावर सातत्याने नितीन गडकरी यांनी आपली मतांची आघाडी कायम ठेवली. सहाव्या-सातव्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सुमारे सात हजारावर मतांनी त्यांना मागे टाकले. आणि भाजप वर्तुळात चिंता व्यक्त झाली. काँग्रेस कार्यकर्ते सुखावले, मात्र हा आनंद पुढे टिकला नाही. त्यानंतरच्या आठ फेऱ्यांनी गडकरी यांना निर्णायक मताधिक्य मिळवून दिले. यानंतर भाजप कार्यकर्तेही रिलॅक्स झाले.
सुरुवातीला गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून लढण्यास कोणीही इच्छुक असल्याचे सुरुवातीला चित्र असताना काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी या लढतीत चुरस निर्माण केली. विदर्भातील लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची दुपारपर्यंत विजय घोडदौड सुरू असताना संघ मुख्यालयी नागपुरात मात्र गडकरी यांनी भाजपची लाज राखली, असेच म्हणता येईल.
नागपूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करता एकट्या पूर्व नागपूरने गडकरी यांना तब्बल ७० हजार मतांचे मताधिक्य दिल्याचे कळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही लक्ष नागपूरकडे होते. दरम्यान, उत्तर व पश्चिम विधानसभा मतदारसंघात काही फेऱ्यांमध्ये गडकरी यांना ठाकरे यांनी पिछाडीवर सोडल्याने निर्णायक मताधिक्यासाठी गडकरी समर्थकांना काहीशी प्रतीक्षा करावी लागली. गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी स्वतः नितीन गडकरी दुपारपासून देशाच्या एकंदर राजकीय घडामोडींवर टीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते. निर्णयाक आघाडी मिळताच गडकरी यांनी आपल्या कुटुंबासह घरी आनंदोत्सव साजरा केला. महाल येथील गडकरी वाड्यासमोर, संघ मुख्यालयाजवळ बडकस चौकातही गडकरी यांच्या विजयाचा जल्लोष साजरा होत आहे.
हेही वाचा :