

पुढारी ऑनलाईन डेस्क : सत्ता स्थापनेबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेणार आहे. उद्या यासंदर्भात आम्ही मित्र पक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूक आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी लढवली. आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी होती.
देशातील मजूर, गरिब, शेतकरी, आदिवासींनी संविधान वाचविले आहे, त्यांचे मी आभार मानतो. यापुढे त्यांच्यासोबत काँग्रेस कायम राहील, अशी ग्वाही देत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या समन्वयातून यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.
आमची बँक खाती गोठवली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, मोदी- शहांनी अनेकांना धमकावले. लोकशाहीवर हल्ला करण्याचा भाजपने प्रयत्न केला. परंतु, काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी घटक पक्षांच्या नेत्यांचा आदर केला. आम्ही सर्वांनी एकसाथ लढत दिली, असे ते म्हणाले. वायनाड, रायबरेलीतील जनतेला मनापासून धन्यवाद देतो, असे ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, हा जनता आणि लोकशाहीचा विजय आहे. मोदी विरूद्ध जनता अशी लढत होती. परंतु पूर्ण बहुमत मिळाले नाही. आम्ही जनमताचा कौल स्वीकार करत आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी आपल्या नावाने मते मागत होते. त्यामुळे हा त्यांचा नैतिक पराभव आहे. बहुमत मोदींच्या विरोधात आहे, असे खर्गे म्हणाले.
प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने निवडणूक लढवली. सरकारी यंत्रणेने मोठा त्रास दिला. मात्र, काँग्रेसचा प्रचार सकारातमक होता. महागाई, बेरोजगारी यावर प्रचार केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत मोदींनी गैरसमज परविले, परंतु ते जनतेने धुडकावून लावले. या निवडणुकीत राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा फायदा झाला. संवैधानिक संस्थांचा विरोधकांवर गैरमार्गाने वापर केला, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली.
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या अपार प्रयत्नामुळे काँग्रेस मजबूत स्थितीत पोहोचली आहे. इंडिया आघाडीतील सगळ्यांनी एकसाथ मिळून प्रचार केला. एकमेकांना मदत केली. लोकांच्या हक्कांसाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी, सीमांच्या रक्षणासाठी आमचे प्रयत्न पुढे सुरूच राहतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा