शिवापूर ते खोपी रस्त्याची चाळण; दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य मार्ग | पुढारी

शिवापूर ते खोपी रस्त्याची चाळण; दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य मार्ग

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: दोन तालुक्यांना जोडणा़र्‍या शिवापूर (ता. हवेली) ते खोपी (ता. भोर) यादरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मार्गावरून जाणार्‍या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, सदर रस्त्याचे काम कधी होणार, याची वाट नागरिक पाहत आहेत.

शिवापूर (ता. हवेली) या गावातून भोर तालुक्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे खोपी गाव. तसेच खेड शिवापूर टोलनाक्यावरील टोल वाचवता यावा म्हणून अनेक व्यावसायिक वाहने या मार्गाचा वापर करतात. रस्त्याशेजारीच लागून शिवापूर, खेड शिवापूर, श्रीरामनगर व खोपी या गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे या गावांतील शेतकरी सदर रस्त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करीत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या रस्त्याची चाळण झाल्याने शेतकरीवर्गासह स्थानिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत याबाबत 2020 मध्ये माहिती दिली होती. दुरुस्तीबाबत ठराव मंजूर करण्यासाठी पत्रक दिले होते. मात्र, नंतर कोरोनामुळे दोन वर्षे गेल्याने ठरावाचे काय झाले माहीत नाही. परंतु, आम्ही अजूनही सदर रस्ता दुरुस्त होण्यासाठी पाठपुरावा करीत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवगंगा खोरे अध्यक्ष प्रवीण धोंडे यांनी सांगितले.

 

Back to top button