पुणे : सारसबाग चौपाटीचे रुपडे पालटणार; आराखडा तयार | पुढारी

पुणे : सारसबाग चौपाटीचे रुपडे पालटणार; आराखडा तयार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: खवय्यांचे आवडीचे ठिकाण असलेल्या सारसबाग चौपाटीचे रूपडे पालटणार आहे. या ठिकाणी इतर शहरांच्या धर्तीवर फूड प्लाझा तयार केला जाणार आहे. यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासनाने त्यामध्ये काही बदल सूचवले आहेत. दरम्यान, या सुधारित फूड प्लाझाचा संपूर्ण खर्च महापालिकेकडून केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

पुण्यातील सारसबाग राज्यातील पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील बागेत येणार्‍या आबालवृद्धांना, अस्सल खवय्यांना खाद्यपदार्थांची ही चौपाटी कायमच खुणावते. मात्र, येथील स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वर्षातून किमान एकदा तरी कारवाई होते. या कारवाईत स्टॉलसमोरील शेड, टेबल, खुर्च्या, शेगड्या, गॅस असे सर्व साहित्य जप्त केले जाते. महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनाने शहरातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली होती.

या मोहिमेअंतर्गत सारसबाग चौपाटीवर कारवाई करून दहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले होते. दरम्यान, वारंवार होणारी अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी स्टॉलधारकांनी पुढाकार घेत तात्पुरता फूड प्लाझाचा आराखडा तयार केला होता. तो महापालिकेला सादर केला होता. मात्र या प्लाझाचा खर्च कोण करणार, या मुद्द्यावर प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर आता महापालिका प्रशासनानेच या चौपाटीच्या नूतनीकरणाचा व फूड प्लाझाचा आराखडा तयार केला आहे. संबंधित संस्थेने आराखडा तयार करून अधिकार्‍यांना सादर केला आहे. मात्र, अधिकार्‍यांनी त्यामध्ये काही बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नूतनीकरणाचा खर्च महापालिका करणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

…असा आहे फूड प्लाझा
चौपाटीवर 7 बाय 5 फुटांचे 51 गाळे (स्टॉल) असतील. त्यात सारसबागेच्या बाजूस 27 तर सणस मैदानाच्या बाजूला 24 गाळे असतील.
स्टॉलच्या समोर अडीच मीटर जागेवर टेबल व खुर्च्या, त्यापुढे दीड मीटर जागा पादचारी मार्गासाठी, त्यालगतच झाडे व कट्ट्यांसाठी सव्वा मीटर जागा असेल.

या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह आणि घोड्यांसाठी स्वतंत्र जागा असेल.
फूड स्ट्रीटवर सरकते बॅरिकेड्स व बुम बॅरिअर असेल.
सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज लाईन आणि पावसाळी लाईनची व्यवस्था असेल.

Back to top button