पुणे : साखर कामगारांची थकीत देणी मिळणार | पुढारी

पुणे : साखर कामगारांची थकीत देणी मिळणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्यातील बंद पडलेल्या व आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांतील कामगारांना त्यांची थकीत कायदेशीर देणी अथवा थकीत मासिक वेतन मिळवून देण्याबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही एक महिन्यात करण्याच्या सूचना कामगार आयुक्तांनी क्षेत्रीय स्तरावर दिल्या आहेत. याप्रश्नी साखर कामगार संघटनांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्याने त्याला उशिरा का होईना यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, कोकण येथील अपर कामगार आयुक्त आणि नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती येथील कामगार उपायुक्तांना याबाबत 19 सप्टेंबर रोजी पत्र देण्यात आले आहे.

तसेच एक महिन्यानंतर या संदर्भात संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांच्या थकीत वेतन व इतर देय रक्कमांबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या अहवालानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात दीड लाखांच्या आसपास साखर कामगार असून बंद साखर कारखान्यांची संख्या 40 ते 45 च्या आसपास आहे. त्यामधील सुमारे 20 हजार साखर कामगारांचे पगार थकीत असून ते मिळण्यासाठी गेली 7 वर्षे संघटना राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आली आहे. अखेर या लढ्यास यश आले असून थकीत रक्कम देण्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरू झाल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. हे काम आता वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.
              – तात्यासाहेब काळे, अध्यक्ष, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे.

Back to top button