पिंपरी : लव्ह, सेक्स अन् धोका..! लग्नाच्या आमिषाने होताहेत बलात्कार | पुढारी

पिंपरी : लव्ह, सेक्स अन् धोका..! लग्नाच्या आमिषाने होताहेत बलात्कार

संतोष शिंदे
पिंपरी : प्रेमात पडल्यानंतर एकमेकांना दिलेली वचनं, आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका शरीरसंबंध साधल्यानंतर हवेत विरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या महिला पोलिस ठाण्यांची दारे ठोठावू लागल्या आहेत. मागील आठ महिन्यांत 161 महिलांनी बलात्कार झाल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. यातील काही अपवाद वगळता बहुतांश महिलांना लग्नाच्या आमिषाने जाळ्यात ओढल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या विविध भागांतून आलेली मंडळी स्थायिक झाली आहेत. त्यामुळे शहर परिसरात उच्चभ्रू सोसायट्यांसोबतच मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी महिलादेखील घराबाहेर पडतात. कामाच्या ठिकाणी सहकार्‍याने जवळीक साधून घात केल्याचे काही प्रकरण समोर आले आहेत.

तसेच, शहर परिसरात मोठ्या शैक्षणिक संस्था व आयटी हब आहे. त्यामुळे तरुण-तरुणी मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. शिक्षण घेत असतानादेखील लग्नाच्या आमिषाने फसवण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आयटी हबमध्ये काम करणार्‍या तरुणीदेखील याचे बळी पडल्याची पोलिसांकडे नोंद आहे. त्यामुळे महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

उदा. लग्नाच्या आमिषाने प्रदीप केशव गित्ते (रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) याने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार 13 फेब्रुवारी ते ऑगस्ट 2021 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला. प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. श्रेयस श्रीराम पेंडसे (29, रा. तळेगाव दाभाडे) याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्याशी खोटे लग्न करून तिची फसवणूक केली. हा प्रकार 4 नोव्हेंबर 2017 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे शहरातील वैद्य कॉलनी, कडोलकर कॉलनी येथे घडला. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहीत महिलाही पडताहेत बळी
काही प्रकरणांमध्ये विवाहीत महिलादेखील भूलथापांना बळी पडल्याचे दिसून येत आहे. वासनांध पुरुष लग्नाचे आमिष दाखवून महिलांकडून आपला हेतू साध्य करून घेतात. तसेच, फोटो काढून ब्लॅकमेल केले जाते. महिलेच्या एका चुकीमुळे संसार उघड्यावर येऊ लागले आहेत.

पालकांशी हवा मनमोकळा संवाद
अलीकडे बहुतांश पालक मुलांना आपला जोडीदार निवडण्याची मुभा देत आहेत. यातूनच अनेकांनी सुखी संसार थाटल्याची उदाहरणे आहेत. मात्र, काही ठिकाणी वयात आलेल्या मुलांचा पालकांशी सुसंवाद नसल्याने त्यांना घरातून योग्य मार्गदर्शन मिळत नाही. पाल्याला बरे-वाईट याची जाणीव नसल्याने फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पालकांनी मुलांशी मनमोकळा संवाद ठेवून या विषयावर खुली चर्चा करण्याची गरज आहे.

बहुतांश प्रेमप्रकरणांमध्ये केवळ शारीरिक आकर्षण असल्याचे दिसून येते. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी हेतुपुरस्सर स्वभावात बदल केला जातो. शरीरसंबंध झाल्यानंतर पुन्हा मूळ स्वभाव समोर आल्याने दोघांमध्ये वाद होतात. त्यामुळे हवाहवासा वाटणारा सहवास अचानक नकोसा वाटतो. दरम्यान, एकमेकांना दिलेल्या वचनांचा विसर पडून जोडीदाराला धोका देण्यापर्यंत मजल जाते.

– डॉ. मनजीत संत्रे, प्राध्यापक व प्रमुख, मानसोपचार विभाग, यशवंतराव चव्हाण रुग्णालय

लग्नाच्या आमिषाने बळी पडणार्‍या महिलांची संख्या वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने कंपनीत काम करणार्‍या महिलांची संख्या जास्त आहे. यातील विशेष बाब म्हणजे विवाहीत महिलागदेखील बळी पडत आहेत. त्यामुळे महिलांनी सावध राहून नैतिकतेचे भान जपणे गरजेचे आहे. तसेच, तरुणींनी आपल्या प्रेमसंबंधाबाबत दोघांच्या घरच्यांशी चर्चा करावी, ज्यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते.

                               – प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

बलात्काराच्या घटना
सन 2019 173
सन 2020 162
सन 2021 164
सन 2022
(ऑगस्ट अखेर) 161

Back to top button