बारामती : सहा जिल्हे कसे सांभाळणार? पालकमंत्री पदावरून अजित पवार यांचा फडणवीसांना टोला | पुढारी

बारामती : सहा जिल्हे कसे सांभाळणार? पालकमंत्री पदावरून अजित पवार यांचा फडणवीसांना टोला

बारामती; पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारकडून पालकमंत्री नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत, ही चांगली बाब आहे. आम्ही यासंबंधी नेहमी मागणी करत होतो, परंतु सरकारने यात अनेक मंत्र्यांना एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर सहा जिल्हे आहेत. ते हे कसं पेलणार, मला तर एका पुणे जिल्ह्याची जबाबदारी असताना नाकीनऊ येत होते, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री नेमणुकीवर भाष्य केले.

बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सभेत बोलताना पवार म्हणाले, सरकार येऊन अडीच महिने झाले तरी पालकमंत्री नेमले नव्हते, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पालकमंत्र्यांची नेमणूक झाली आहे. काही मंत्र्यांकडे एक, काहींकडे दोन तर फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

पालकमंत्रिपद म्हणजे कामाचा प्रचंड व्याप असतो. लोकांची अनेक कामे मार्गी लागतात, पण ते सहा जिल्ह्यांचे काम कसे सांभाळणार. शिंदे सरकारला आता संधी मिळाली आहे. त्यांनी गद्दारी केली आहे की नाही माहीत नाही, पण आता सत्ता मिळाली आहे तर जनतेची कामे करा, लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करा, असे पवार यांनी म्हटले आहे.

Back to top button