धनकवडी परिसरात डेंग्यूचा ‘ताप’; रुग्ण वाढल्याने नागरिक हैराण | पुढारी

धनकवडी परिसरात डेंग्यूचा ‘ताप’; रुग्ण वाढल्याने नागरिक हैराण

धनकवडी; पुढारी वृत्तसेवा: धनकवडी, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाण्याची डबकी अजूनही साचून असल्याने डासांचा उच्छाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डेंग्यूसह इतर आजारांनीही डोके वर काढले आहे. ताप, थंडी, खोकला यासह विविध आजारांच्या तपासण्या करण्यासाठी परिसरातील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी होत आहे. धनकवडी परिसरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

महापालिका व क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासनाने परिसरातील सोसायट्या, घरे आणि चाळींमध्ये कोणत्याही प्रकारची फवारणी अद्याप केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे धनकवडी, आंबेगाव पठार या परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने या पार्श्वभूमीवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहननगर, उत्कर्षनगर परिसरात डेंग्यूसदृश आजारांचे अनेक रुग्ण दवाखान्यांमध्ये औषधोपचार घेत आहेत. या आजारांना रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

डेंग्यूमुळे बालिकेचा मृत्यू ?
मोहननगर परिसरात डेंग्यूमुळे एका 14 वर्षांच्या बालिकेचा नुकताच मृत्यू झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत. महापालिकेच्या कीटक विभागामार्फत परिसरात सर्वत्र फवारणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपली असून, सध्या प्रशासकांची सत्ता आहे. यामुळे प्रभागांमधील लोकांच्या विविध समस्या सुटत नसून आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरात डेंग्यू व मलेरिया या आजाराने थैमान घातले आहे.

गेल्या काही दिवसांत सतत होणार्‍या पावसामुळे शहरभर डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे महापालिका प्रशासन डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करत आहेत. तसेच, औषध फवारणीचे काम आवश्यक त्या ठिकाणी सुरू आहे. नागरिकांनी स्वतःच्या घरासह परिसरामध्ये पाणी साठू देऊ नये. पाणी साठलेले असेल, तर त्याचा निचरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
                                                                      – डॉ. संजीव वावरे,
                                                      सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

पावसामुळे आजार वाढले…
पावसामुळे काही ठिकाणी पाण्याची डबकी साचून
परिसरात डासांचा उच्छाद वाढल्याने नागरिक त्रस्त
ताप, थंडी, खोकल्यासह विविध आजारांचे रुग्ण वाढले
महापालिकेचे दुर्लक्ष  होत असल्याचा नागरिकांचा आरोप
अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांवर औषधोपचार मागणी

Back to top button