प्रवाशांसाठी लालपरी; विद्यार्थी मात्र रस्त्यावर; भिगवण परिसरातील रोजचेच चित्र | पुढारी

प्रवाशांसाठी लालपरी; विद्यार्थी मात्र रस्त्यावर; भिगवण परिसरातील रोजचेच चित्र

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: वेळी, अवेळी धावणारी बारामती शटल, विद्यार्थी व प्रवाशांची ओसंडून वाहणारी गर्दी, बस मिळत नाही म्हणून अगदी जीव धोक्यात घालून बाहेरून लोंबकळणारे विद्यार्थी असे बिहारी चित्र सध्या भिगवण-बारामती शटल प्रवासात अनुभवास मिळत आहे. त्यामुळे म्हणायला ‘प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी पण विद्यार्थी मात्र रोजच रस्त्यावरी‘ असा मनमानी व भोंगळ कारभार बारामती शटलचा सुरू आहे.

बारामती आगाराच्या भिगवण-बारामती शटलचे वेळापत्रक कमालीचे कोलमडून गेले आहे. त्यामुळे शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. सध्या चार शटल बसच्या दिवसातून सात फेर्‍या होतात. तरीही शेकडो विद्यार्थी जागोजागी ताटकळत बसलेले असतात. मुळात तर भिगवण व बारामती येथून ये-जा करणार्‍या बस फुल्ल झालेल्या असतात.

त्यामुळे शेटफळगढे, पिंपळे आदी ठिकाणच्या विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही व गर्दीमुळे बसही सहसा थांबत नाहीत. एखादी दुसरी शटल थांबलीच तर आतमध्ये चेंगराचेंगरी होते, जिवाचा कोंडमारा होतो. काही वेळेस तर विद्यार्थी शटलच्या बाहेर धोकादायक पद्धतीने लोंबकळत प्रवास करतात. बर्‍याचदा शटल पुढे-मागे थांबवली जाते. त्यावेळी शटल पकडण्यासाठी होणारी धावाधाव जिवावर बेतणारी ठरते आहे.

वास्तविक, शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत शटलच्या फेर्‍या वाढवण्याची गरज आहे. भिगवण, तक्रारवाडी, शेटफळगढे या ग्रामपंचायतीने यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही बारामती आगार याची गांभीर्याने दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे मोठा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तासभर रोखल्या शटल
दरम्यान, गुरुवारी (दि. 22) बारामती आगाराच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून संतापलेल्या शेटफळगढे येथे विद्यार्थ्यांनी भिगवण व बारामती बाजूकडून येणार्‍या जाणार्‍या बसच तासभर रोखून धरल्या. यामुळे भिगवण-बारामती मार्गावरील विद्यार्थी व प्रवाशांचा खोळंबा झाला. अखेर नियोजनाचे आश्वासन मिळाल्यानंतर शटल सुरू झाल्या. तोपर्यंत मार्गावरील विद्यार्थ्यांना कॉलेज व शाळेत जाण्यास उशीर झाला.

मुलीही असुरक्षित…!
मुळात शटलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने मुलींना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच सात वाजेनंतर शटल बंद होते. साहजिकच सातची शटल हुकली तर विद्यार्थी व इतर प्रवाशांना पर्याय शिल्लक नसतो. विशेषतः मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. त्यामुळे पूर्ववत शेवटची शटल ही आठ ते साडे आठच्या दरम्यान असावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button