बाणेर : अधिकार्‍यांना मंदिरात कोंडले | पुढारी

बाणेर : अधिकार्‍यांना मंदिरात कोंडले

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: बालेवाडी भागातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अधिकार्‍यांना विचारणा केली असता योग्य उत्तर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना बैठकीला बोलावून विठ्ठल मंदिरात तीन ते चार तास कोंडून ठेवले.
बालेवाडीतील पाणी प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांत कमालीची नाराजी आहे. पुणे शहरातील पाणीपुरवठा करणारी धरणे भरलेली असली, तरीही या भागात पाणी प्रश्न भेडसावत आहे. दिवसाआड व कमी दाबाने येणार्‍या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना वारंवार विचारणा केली असता, योग्य उत्तर मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्यासाठी अनेक वेळा बैठका घेतल्या, तरी हा प्रश्न अद्याप सुटला नाही. बैठकांत अधिकारी नुसतीच आश्वासने देतात. त्यामुळे विठ्ठल मंदिरात दुपारी एक वाजता बोलावलेल्या बैठकीला अधिकारी आले व नागरिकांनी बाहेर असलेल्या गेटला कुलूप लावून अधिकार्‍यांना आत कोंडले.

त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून कुलूप तोडून चार ते पाचच्या सुमारास अधिकार्‍यांची सुटका केली. याबाबत महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले की, गेले चार-पाच दिवस पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांचा रोष होता. तो त्यांनी व्यक्त केला. परंतु, ही पद्धत चुकीची असून आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

बालेवाडीतील नागरिक वारंवार पाठपुरावा करूनदेखील परिसरातील पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मंदिराला टाळे लावून अधिकार्‍यांना कोंडून ठेवले. या घटनेमुळे तरी अधिकार्‍यांना जाग येईल व पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.
                                                  – अमोल बालवडकर, माजी नगरसेवक

Back to top button