पिंपरी : जलतरण तलावाचे खासगीकरण थांबवा, नागरिकांची भावना | पुढारी

पिंपरी : जलतरण तलावाचे खासगीकरण थांबवा, नागरिकांची भावना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध 7 जलतरण तलाव खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येत आहेत. तसे झाल्यास संबंधित ठेकेदार मनमर्जी तिकीट लावेल. तसेच, सोयीनुसार तलाव सुरू ठेवेल. त्यामुळे करदाते पोहणारे नागरिक व खेळाडूंचे नुकसान होणार आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने शहरातील विविध भागांत 12 जलतरण तलाव बांधले आहेत. त्या माध्यमातून शहरातील नागरिक, तरुण आणि मुलांना तसेच, महिला, तरुणी व मुली यांना पोहता यावे म्हणून 10 रुपये नाममात्र दरात ते पालिकेने सुरू ठेवले होते.

त्याला शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्यात सर्व बॅच फूल असतात. पोहण्यास नागरिक व खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे; मात्र नुकसान होत असल्याचे कारण पुढे करीत क्रीडा विभागाने सात जलतरण तलावांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी खासगी संस्थांकडून दर मागविले आहेत. ठेकेदारी पद्धतीने जलतरण तलाव चालविण्यास दिल्यास ठेकेदाराची मनमानी सुरू होणार आहे. ते त्यांना वाटेल तसा तिकिटाचा दर ठेवतील. तसेच, त्यांच्या सोयीनुसार तलाव खुला ठेवला जाईल. त्यामुळे तलावाच्या आजूबाजूच्या करदात्या नागरिक, तरुण व मुलांना पोहण्याचा आनंद घेत येणार नाही; तसेच खेळाडूंना सरावासाठी तलाव उपलब्ध होणार नाही. पालिकेने जलतरण तलावाचे खासगीकरण न करता ते पूर्वीप्रमाणे स्वत : चालवावेत, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. तरीही पालिकेने तलावाचे खासगीकरण केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

Back to top button