प्रदूषण करणार्‍या गुर्‍हाळांवर होणार कारवाई; दौंडचे तहसीलदार अजिंक्य येळे यांचे संकेत | पुढारी

प्रदूषण करणार्‍या गुर्‍हाळांवर होणार कारवाई; दौंडचे तहसीलदार अजिंक्य येळे यांचे संकेत

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: भीमा नदीच्या पट्ट्यात तसेच शेजारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुर्‍हाळ व्यवसाय सुरू आहे. ज्या गावामध्ये गुर्‍हाळ प्रदूषणाचा विषय गंभीर आहे, अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या विषयावर स्वतंत्र विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. त्यांच्या ठरावानुसार या गुर्‍हाळघरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दौंडचे तहसीलदार अजिंक्य येळे यांनी दिले. त्यामुळे प्रदूषण पसरविणारे गुर्‍हाळघर आता प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.

तालुक्यातील या गुर्‍हाळांवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर, चपला व प्रदूषण होणार्‍या वस्तू जळणासाठी वापरल्या जात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे. याविषयी दै. ‘पुढारी’ने सडेतोड वृत्तांकन करीत सर्वसामान्य जनतेचा आवाज पुढे मांडला आहे. या वृत्ताचे सर्वत्र अभिनंदन होत असतानाच याबाबत नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.
याविषयीच्या काही विशेष प्रतिक्रिया.

ज्या गावामध्ये गुऱ्हाळ प्रदूषणाचा विषय गंभीर आहे, अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या विषयावर स्वतंत्र विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. नागरिकांचे मत घेऊन त्यासंदर्भात ठराव संमत करून तो ठराव प्रदूषण विभागाकडे पाठवून होणार्‍या प्रदूषणाविषयी पाहणी करण्याविषयी पत्रव्यवहार करावा. त्यानंतर अशा सर्व गुऱ्हाळघरांवर कारवाई करण्यात येईल.
                                            – अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी, दौंड

प्रदूषण विभागाला यापूर्वी देखील गुऱ्हाळ प्रदूषणासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. आता देखील प्रदूषण विभागाला तत्काळ पत्रव्यवहार करणार आहे. तसेच, गूळ बनविताना देखील गुळात चॉकलेटसारखे पदार्थ टाकून भेसळ केली जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाला देखील तत्काळ पत्रव्यवहार करणार आहोत.
                                                       – संजय पाटील, तहसीलदार, दौंड

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी येणार्‍या गुऱ्हाळ कामगारांमध्ये श्वसन, दमा, खोकला व सर्दी यांसारखे आजार दिसून येतात. गुऱ्हाळघरातील प्रदूषणाचा पहिला धोका हा कामगार व शेजारच्या नागरिकांना आहे. त्यामुळे अनेकदा गुऱ्हाळ चालक व मालक यांना गुऱ्हाळाची धुराडी उंच करावीत, असे आवाहन करण्यात आले होते तसेच पुन्हा देखील असे आवाहन करण्यात येत आहे.
 

                                                     – डॉ. तुकाराम बनसोडे,                                                                          वैद्यकीय अधिकारी, नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र

शेतकरीराजा संघर्ष समितीच्या माध्यमातून मागे जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुऱ्हाळातील प्रदूषण विषयावर बेमुदत उपोषण केले होते. त्या वेळी जिल्हाधिकारी यांनी आंदोलकांना अशा प्रदूषण करणार्‍या गुऱ्हाळांवर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्या वेळी काही ठिकाणी कारवाई झाली. मात्र, कारवाईत सातत्य राहिले नसल्याने पुन्हा एकदा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जर कारवाईमध्ये सातत्य राहिले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल.
                                               – मंगेश फडके,                                                                                    प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दारूबंदी समिती

भीमा नदीच्या पट्ट्यातील शेतकर्‍यांचे ऊस हे प्रमुख पीक असून, अलिकडच्या दोन-तीन दशकांमध्ये उसाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे दरवर्षी अतिरिक्त ऊसगाळप होण्यासाठी गुऱ्हाळ व्यवसायाची मदत होत आहे. परंतु, प्लास्टिक, रबर, टायर आणि प्रदूषण होणार्‍या कचर्‍याचे ज्वलन केल्याने परिसरात प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर गूळ बनवताना चॉकलेट, स्क्रॅप, साखर यांची भेसळ होत असल्याने भविष्यात आरोग्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. यामुळे या प्रकरणाची प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न आणि औषध प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

                                                               – माऊली शेळके,                                                                        सरचिटणीस, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा

Back to top button