मुख्यमंत्र्यांसारखी वेशभूषा धारण करणार्‍या तोतयावर गुन्हा, गुन्हेगार शरद मोहोळसोबतचा फोटो केला होता व्हायरल | पुढारी

मुख्यमंत्र्यांसारखी वेशभूषा धारण करणार्‍या तोतयावर गुन्हा, गुन्हेगार शरद मोहोळसोबतचा फोटो केला होता व्हायरल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभूषा व पोशाख परिधान करुन सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍या तोतयावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) असे या तोतयाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक सोमवारी सकाळी बंडगार्डन परिसरात गस्त घालत असताना त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचे आढळून आले. व्हॉटसअप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असल्याचे दिसत आहे. फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून विजय माने याचा असल्याचे समोर आले.

विजय माने हा नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता. लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न विजय माने व इतरांनी करुन मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबत फोटो सोशल मीडियात व्हायरल करत गैरसमज पसरविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापुर्वी एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यामध्ये तोतयापुढे काही महिला स्टेजवर नाचताना दिसत होता. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button