पुणे : ज्ञानविश्व समजण्यासाठी पाली शिका: पद्मश्री डॉ. गणेश देवी यांचा सल्ला | पुढारी

पुणे : ज्ञानविश्व समजण्यासाठी पाली शिका: पद्मश्री डॉ. गणेश देवी यांचा सल्ला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘आपला इतिहास, आपला समाज आणि आपले ज्ञानविश्व समजून घेण्यासाठी पाली शिकणे आवश्यक आहे. वर्तमानकाळाच्या बरोबर राहून भूतकाळाचा अभिमान बाळगणारा देश आपल्याला जर बनायचं असेल, तर पालीतील ज्ञानविश्व आपल्या देशासमोर घेऊन जाणे, हे आपले संवैधानिक कर्तव्य आहे,’ असे मत पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे 17 सप्टेंबर रोजी पंधरावा पाली दिन विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘जर या देशाचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर पालीला स्पर्श केल्याशिवाय तो समजेलच कसा,’ असा प्रश्न उपस्थित केला.

भारतात पाली व बौद्ध अध्ययनाचे पुनरुज्जीवन करणार्‍या अनागारिक धर्मपाल या सिंहली विद्वानांचा हा 158 वा जन्मदिन. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे हा दिवस दर वर्षी साजरा केला जातो. ‘पाली दिन फक्त पाली भाषेचा गौरव दिन नसून बौद्ध धर्माशी संबंधित बौद्ध संकर संस्कृत, अपभ्रश, गांधारी आणि सैंधवी प्राकृत अशा विस्मरणात गेलेल्या सर्व भाषांचा व बहुभाषिक बौद्ध संस्कृतीचा तो गौरव दिन आहे.

या सगळ्या भाषांना सोबत घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत,’ अशा शब्दांत या दिवसांचे औचित्य विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांनी विषद केले. बोधगयेचा महाविहार स्वतंत्र करण्यासाठी अनागारिक धर्मपालांनी जे प्रयत्न केले ते पूर्णत्वाला नेण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी, अशी अपेक्षा कार्यक्रमाचे विशेष अतिथी व माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी या वेळी व्यक्त केली.

समानतेच्या परंपरेची बिजे पाली साहित्यात…
भारताच्या भाषिक ताण्या-बाण्यांचा इतिहास समजण्यासाठी पाली आणि सर्व प्राकृत भाषा अतिशय महत्त्वाच्या आहेत. समानतेच्या परंपरेची बिजे पाली साहित्यात आहेत, असेही डॉ. देवी यांनी स्पष्ट केले.

Back to top button