पुणे : ऊस गाळप धोरणासाठी आज मंत्री समितीची मुंबईत बैठक | पुढारी

पुणे : ऊस गाळप धोरणासाठी आज मंत्री समितीची मुंबईत बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील यंदाचा हंगाम 2022-23 मधील ऊस गाळपाचे धोरण ठरविण्यासाठी मुंबईत सोमवारी (दि.19) सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होत आहे.
गाळप हंगाम कोणत्या तारखेपासून सुरु करायचा हा महत्वपूर्ण निर्णय त्यामध्ये अपेक्षित असून विविध निधींची कपात, ऊस तोडणी यंत्रांसाठी पुन्हा अनुदान योजना सुरु करण्याच्या मागणीवरही चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार मंत्री अतुल सावे व मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर व अन्य पदाधिकारी, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे व अन्य पदाधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्य सरकारने 1 ऑक्टोंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरु करण्याची शिफारस वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने या खाजगी साखर कारखान्यांच्या संघटनेने साखर आयुक्तांकडे केली आहे. राज्यातील उसाचे वाढीव लागवड क्षेत्र व उत्पादन आणि तोडणी मजुरांची संख्या व उपलब्धता पाहता ऊस तोडणी यंत्राचा वापर अत्यंत अनिवार्य आहे.

पंरतु त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अनुदानाशिवाय ते विकत घेण्यास शेतकरी, साखर कारखाने व व्यावसायिकांना शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाने 50 टक्के अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली असून भांडावलाकरिता बँकामार्फत सुलभ कर्ज प्राप्त होण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न होण्याची मागणीही संघटनेने केलेली आहे.

साखर निर्यातीसाठी खुल्या सर्वसाधारण परवान्याअंतर्गत (ओपन जनरल लायसन्स) देशातून 80 लाख टन साखर निर्यातीची शिफारस राज्याने केंद्र सरकारकडे करावी. साखर विक्रीचा किमान दर उत्पादन खर्चावर आधारित निश्चित करुन 2022-23 या हंगामापासून क्विंटलला तो किमान 3600 रुपये करण्याची शिफारस राज्याने करण्याची मागणीही विस्माने केली आहे.

 ऊस गाळप हंगामाची सद्यस्थिती :
ऊस लागवड क्षेत्र : 14.87 लाख हेक्टर
ऊस उत्पादकता प्रति हेक्टरी : सरासरी उत्पादकता 95 टन
ऊस उत्पादन : 1413 लाख टन
होणारे प्रत्यक्ष ऊस गाळप : 1343 लाख टन
साखर उत्पादन लाख टनात : 139 लाख टन
इथेनॉलमुळे घटणारे साखर उत्पादन : 12 लाख टन

Back to top button