मेघोलीचे मतदार दोन ग्रा.पं.ना करणार मतदान; निवडणूक विभागाचा अजब कारभार | पुढारी

मेघोलीचे मतदार दोन ग्रा.पं.ना करणार मतदान; निवडणूक विभागाचा अजब कारभार

मंचर; पुढारी वृत्तसेवा:  मेघोली गावातील मतदार दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. निवडणूक विभागाच्या अजब कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागात विविध तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार विधानसभेसाठी तयार केलेली आणि विधानसभेच्या मतदारसंघाचा जो भाग ग्रामपंचायत निवडणूक मतदारसंघात समाविष्ट केला असेल अशा भागासाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेली मतदार यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरली जाते. मेघोलीचा कुशिरे बुद्रुक या ग्रुप ग्रामपंचायतीत समावेश आहे.

कुशिरे बुद्रुकची निवडणूक 2016- 17 मध्ये झाली होती. त्यावेळी या गावातील मतदारांनी कुशिरे बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी मतदान केले होते. परंतु आता निवडणूक प्रशासनाने मेघोलीतील मतदार यादी ही शेजारील जांभोरीच्या ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादीत समाविष्ट केली आहे.  मेघोली हे गाव कुशिरे बुद्रुक ग्रामपंचायतीत समाविष्ट असून ते जांभोरी ग्रामपंचायतसाठी कसे काय मतदान करू शकतात, असा प्रश्न निवेदनाद्वारे जांभोरीतील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गिरंगे यांनी तहसीलदार आंबेगाव व गटविकास अधिका-यांना विचारला आहे.

तसेच मेघोली गाव जांभोरी ग्रामपंचायतला जोडले असेल तर ते कोणत्या आदेशाद्वारे हाही प्रश्न विचारला आहे. मतदार यादीतील चुका टाळण्यासाठी यादी लोकांना पाहण्यासाठी गावाच्या चावडीत किंवा पंचायतीत ठेवण्याची तरतूद आहे. तरी या मतदार याद्या नागरिकांना पाहण्यासाठी ठेवल्या नव्हत्या, असेही त्यांनी नमूद केले. ठेवल्या असतील तरी जांभोरीतील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना सूचित केले नव्हते.

त्यामुळे या मतदार याद्यांवर आक्षेप घेता आला नाही, असेही गिरंगे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत मेघोलीतील मतदारांना दुबार मतदानाची वेळ येऊ नये तसेच मतदार यादीतील गोंधळप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. निवडणूक अधिका-यांनी योग्य भूमिका न घेतल्यास जिल्हाधिका-यांकडे किंवा राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button