बारामती लोकसभा मतदारसंघातील कालव्यांची कामे त्वरित मार्गी लावा | पुढारी

बारामती लोकसभा मतदारसंघातील कालव्यांची कामे त्वरित मार्गी लावा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत असलेल्या विविध तालुक्यांतील कालवा दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आढावा बैठकीत केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत असलेल्या विविध तालुक्यांतील कालवा, पाणी नियोजन आदी प्रश्नांबाबत खासदार सुळे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार तालुकानिहाय पुढीलप्रमाणे :- भोर तालुका – निर डावा कालवा मंजुरी देऊन निविदा करण्यात यावी, निरा नदी व गुंजवणी नदीवरील बंधार्‍यांचे अंदाजपत्रक प्रत्यक्ष पाहणी करून तयार करण्यात यावे व तातडीने काम सुरू करावे, दिवळे येथील बंधार्‍यावरील कालवा दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून त्यास मंजुरी द्यावी.

मुळशी तालुका –
लव्हार्डे येथे कातकरी समाजाला शासकीय योजनेतून घरकुल योजना राबवायची आहे. तथापि, त्यांना स्वतःची जागा नाही. त्यामुळे कातकरी समाजाला घरकुल बांधणेसाठी जागा उपलब्ध करून मिळावी, टेमघर ( ता. मुळशी) धरणक्षेत्रामध्ये 2 बुडीत बंधारे व्हावेत.

वेल्हे तालुका –
वांगणी विभाग व वाजेघर विभाग उपसासिंचन योजना मंजूर होण्याबाबत कार्यवाही करा. गुंजवणी धरण कोदापूर गावठाण क्र. 2 येथे नागरी सुविधा मिळण्याबाबत प्रयत्न करावेत. गुंजवणी नदीवर चालू असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या कामांचे अवलोकन करावे. धरणाच्या भिंतीपासून ब्लू वॉटर रिसॉर्टपर्यंत रस्त्यालगत संरक्षक कठडे, लोखंडी किंवा आरसीसीमध्ये बसवावे, पुनर्वसन गावठाण क्र. 2 व कुंभार वाडा अडवली येथील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात, खुला कॅनॉलसाठी असणारे सातबारावरील शेरे कमी करणे.

दौंड तालुका –
कुसेगाव येथील विजयवाडी तलाव जानाई योजनेतून पाणी सोडणे, ग्रामपंचायत खोर येथील डोंबेवाडी तलावात पुरंदर उपसा योजनेतील पोंढे फाटावरून कायमस्वरूपी बंधिस्त 3 कि.मी. लांबीची बंदिस्त पाईपलाईन व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सदर पाईपलाईन झाल्यास खोर व देऊळ गाव गाडा या दोन गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल. पडवी येथे गायकवाड तलाव पाणी सोडण्याची योजना मंजूर होती, ती अद्याप चालू झाली होती, पण पुढे तांत्रिक कारणामुळे सदर प्रक्रिया पूर्ण झाली नाही. सदर ठिकाणचे पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे . वासुंदे गावातील असणारे तलाव भरण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, गावठाण तलाव, जगताप तलाव, वागदरा तलाव, बारवकर तलाव व वंचित लोंढे तलाव, जांबले वस्ती नंबर 1 तलाव पूर्वीच्या सर्वेनुसार पाईपलाईन कार्यान्वित करण्यात यावी.

खडकवासला –
खडकवासला धरणाचे पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात यावी, खडकवासला धरणाशेजारी न्यू कोपरे येथे पाटबंधारे विभागाची पडीक जागा आहे, त्या जागेत उद्यान विकसित व्हावे व ते स्थानिकांना वापरासाठी उपलब्ध व्हावे, मौजे गुरोळी, (ता. पुरंदर,) येथे महादेव मंदिराशेजारील सिमेंट नालामधून शेती सिंचनासाठी पाणी उपसा होणेकरिता विद्युत रोहित्र मंजूर व्हावे.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ –
पुरंदर उपसा जलसिंचन भगीरथ योजना ही पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. या योजनेमधून पुरंदर तालुक्यातील सुमारे 25 हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. चालू परिस्थितीमध्ये यापैकी काही क्षेत्राला या योजनेतून पाणी मिळत आहे. परंतु, पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व शेतकर्‍यांना शेतीला पाणी मिळेल. तसेच, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य वाहिन्या आहेत, तिथंपासून पाझर तलाव, बंधारे भरण्यासाठी बंद पाईपलाईन व्हावी व वाढलेली पाणीपट्टी कमी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

जानाई शिरसाई योजनेतून पुरंदर तालुक्यातील 5 गावांतील 5 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येते. परंतु गेल्या 5/10 वर्षांपासून पुरंदर तालुक्यातील क्षेत्राला पाणी मिळत नाही. तसेच, जानाई-शिरसाई योजनेचे पाणी कॅनॉल व पाटचारीने शेतपर्यंत येत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे जर बंद पाईपलाईनद्वारे पाणी पाझर तलाव व बंधार्‍यापर्यंत सोडले, तर पाण्याचा अपव्यय टळेल. मौजे वडकी गट नं. 309, 972 मधून 20 आर जागावरील योजनेसाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प व पाण्याची टाकी बांधकाम करणे व ये – जा करण्यासाठी रस्ता परवानगी मिळणेसाठी वनविभागाची परवनागी मिळावी. मस्तानी तलाव मालकी हक्काबाबत सातबारा झालेला नाही, तसेच पाणी साठवणुकीबाबत परवानगी मिळावी.

Back to top button