उरुळी कांचन : भाजपने आधी ‘यशवंत’ सुरू करून आश्वासन पाळावे | पुढारी

उरुळी कांचन : भाजपने आधी ‘यशवंत’ सुरू करून आश्वासन पाळावे

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघांत केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून मतदारसंघांच्या दौर्‍यावर येत आहेत. केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघांची जबाबदारी दिल्याने भाजपने 17 महिने आधीच मतदारसंघांत जिंकण्याचे मनसुबे स्पष्ट केले असले तरी भाजपने यापूर्वी दिलेली अश्वासने व शब्द पूर्ण करून पाळावेत, असाच चर्चेचा सूर सर्वत्र उमटत आहे.

केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह प्रभारी म्हणून येत असलेल्या शिरूर मतदारसंघातील हवेली तालुक्यात अनेक प्रश्न सोडविण्याची आश्वासने भाजपच्या राज्यातील मंर्त्यांनी वेळोवेळी सत्तेच्या काळात दिली आहेत. मात्र ती आश्वासने फोल ठरल्याचा अनुभव हवेली तालुक्यातील जनतेला आहेत.

राज्यात 2014 ते 2019 पर्यंत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील यशवंत कारखाना बंद पाडण्यासहीत कारखाना मालमत्ता गिळंकृत करण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बडे नेते करत असल्याचा गंभीर आरोप करीत राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचे प्रयत्न केले होते. 2014 मध्ये राज्यात सत्तेत आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कारखाना पुढील 100 दिवसांत चालू करून दाखवू, असे अश्वासने दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही.

जिल्ह्यातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीने यशवंत कारखान्याचा पुरेपूर वापर केला, मात्र कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी बळ दिले नाही. सहकाराचा ऐकेकाळी आदर्श असलेला हा कारखाना 11 वर्षाच्या कालखंडात अक्षरशः बोडका झाला आहे. शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांचे करोडो रुपये देणे अडकून शेतकरी देशोधडीला लागला आहे. गेली 11 वर्षे शेतकर्‍यांची ऊस घालविण्यासाठी फरफट होऊन बाजारभावात तफावत मिळाली आहे. शेतकर्‍यांचे हे दुखणे सोडविण्याऐवजी राजकीय पोळी भाजण्यात धन्यता मानण्यात येत आहे.

गत अडीच वर्षापूर्वी राज्यात सत्तेत येण्यापूर्वी शरद पवार यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी कारखाना सुरू करून दाखवू, अशी आश्वासने दिली. मात्र पूर्ण होऊ शकली नाहीत. फडणवीस आता उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत. केंद्रीय पातळीवर इथेनॉलचे धोरण आखले जात आहे.

केंद्राकडून इथेनॉल कारखान्यांना अनुदान देण्यात येत आहे. मग तुमचा एक प्रयत्न हा उत्तम इथेनॉल उत्पादक कारखाना होऊ शकतो, मात्र या ठिकाणी इच्छाशक्तीची गरज आहे. केंद्रीय मंर्त्यांनी शिरूर दौर्‍यावर उजाडलेला कारखाना पाहावा, अशी तळमळ सभासद व्यक्त करीत आहेत.

Back to top button