पुणे : प्रशासकाची मुदत उद्या संपणार | पुढारी

पुणे : प्रशासकाची मुदत उद्या संपणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेवर सहा महिन्यांपूर्वी प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली. ही मुदत गुरुवारी (दि.14) संपत आहे. मात्र, शासन स्तरावर निवडणुकीच्या संदर्भात काहीच हालचाली नसल्याने प्रशासकास आणखी सहा महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सभागृहाची मुदत गेल्या 15 मार्च रोजी संपुष्टात आली. त्यामुळे राज्य शासनाने आयुक्त विक्रम कुमार यांची सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका लांबवू नयेत.

त्यासाठीचा कार्यक्रम 2 आठवड्यांत जाहीर करावा. तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाची प्रभाग रचना 11 मार्चपूर्वी अंतिम झाली आहे, ती गृहीत धरावी, असे आदेश एप्रिलमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिले होते. त्यानंतर शासनाने ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करत न्यायालयात अहवाल सादर केला आणि आरक्षणास मंजुरी मिळाली. त्यामुळे तीन सदस्यांची प्रभाग रचना गृहीत धरून ओबीसी आरक्षणाची सोडतही काढण्यात आली. त्यामुळे वेळेत निवडणूक होऊन प्रशासकाचा कार्यकाळ संपुष्टात येईल, असे वाटत होते.

मात्र, सरकार बदलल्याने अंतिम प्रभाग रचना शासनास सादर होण्याच्या एक दिवस आधी सरकारने निवडणूक कार्यक्रमास स्थगिती दिली. तसेच 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश दिले. पावसाळी अधिवेशनात याबाबत कायदाही केला. मात्र, या सर्व प्रक्रियेत प्रशासकांचा कालावधी 15 सप्टेंबर रोजी संपत आहे. निवडणुकांबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे महापालिकेवर नेमण्यात आलेल्या प्रशासकास आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

 

Back to top button