राज्यसेवेतून एक हजार पदांची भरती करा, राज्यभरातील उमेदवारांची टि्वटर मोहीम | पुढारी

राज्यसेवेतून एक हजार पदांची भरती करा, राज्यभरातील उमेदवारांची टि्वटर मोहीम

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील 100 टक्के पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली असूनही राज्यसेवा 2022 मध्ये केवळ 501 पदे समाविष्ट आहेत. पुढील वर्षी राज्यसेवेची परीक्षा पद्धत बदलणार असल्याने राज्यसेवा 2022 साठी सर्व संवर्गातून मिळून किमान एक हजार पदांची भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी राज्यभरातील उमेदवारांनी सोमवारी टि्वटर मोहीम राबवली.

राज्यसेवा परीक्षा पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल 2023पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसेवा 2022 ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची अखेरची परीक्षा असणार आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवा 2022 द्वारे एकूण 501 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील उमेदवारांकडून एक हजार पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली. तसेच राजस्थानच्या राज्यसेवेत 998 पदांची भरती होते, तर महाराष्ट्रात का होत नाही, असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीमार्फत 100 टक्के पदभरतीला मान्यता दिलेली आहे. मात्र, शासनाच्या 32 संवर्गांपैकी अकरा संवर्गांतील पदे राज्यसेवेत समाविष्ट नाहीत. पुढील वर्षापासून राज्यसेवेची परीक्षा पद्धत बदलणार असल्याने उमेदवारांसाठी हा बदल आव्हानात्मक होईल. त्यामुळे राज्यसेवा 2022द्वारे किमान एक हजार पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे उमेदवारांनी नमूद केले.

परीक्षार्थीं म्हणतात…

मुख्यमंत्र्यांची एमपीएससीकडून 100 टक्के पदभरतीला मान्यता
सरकारी विभाग रिक्त पदांचे मागणीपत्र पाठविण्याबाबत उदासीन
राज्यसेवा 2022 ही शेवटची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा
32 संवर्गांतील रिक्त पदांचे मागणीपत्र तत्काळ पाठवावे

Back to top button