पुणे : म्हाडाच्या पात्र ठरलेल्या सदनिकाधारकांचे शिबिर | पुढारी

पुणे : म्हाडाच्या पात्र ठरलेल्या सदनिकाधारकांचे शिबिर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 5211 घरांच्या संगणकीय सोडतीचा म्हाडाकडून प्रारंभ करण्यात आला. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनांतील 278 सदनिका, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या 2845 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2088 सदनिका अशा एकूण 5211 सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा हा कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे) आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत पार पडली. या वेळी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आणि अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम झाला. मागील 2 ते 3 वर्षांपासून पुणे मंडळाने सोडतीनंतरच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी पात्रता शिबिराची अभिनव कल्पना अमलात आणली आहे.

यामध्ये सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना ई-मेलद्वारे सूचनापत्र व त्यासोबत पात्रतेसाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची यादी व विहित नमुने पाठविले जातात. अशा अर्जदारांसाठी पुणे मंडळात 4 दिवसांचे पात्रता शिबिर आयोजित करण्यात येते. त्रुटी असलेल्या अर्जदारांना ठरावीक कालावधीत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली जाते. जुलै 2012 च्या सदनिका सोडतीचे पात्रता शिबिर 12, 13, 14 व 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी माने पाटील यांनी दिली.

उपलब्ध सदनिका
पुणे महानगरपालिका – 575 सदनिका
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका – 1513 सदनिका
20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना – 2088 सदनिका

 

 

Back to top button