पिंपरी : शिक्षणावरील वाढत्या करामुळे पालक मेटाकुटीला | पुढारी

पिंपरी : शिक्षणावरील वाढत्या करामुळे पालक मेटाकुटीला

दीपेश सुराणा:

पिंपरी : सरकारने विविध शालेय साहित्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के वाढविला आहे. तर, काही शालेय साहित्याला पूर्वी जीएसटी नव्हता. त्यासाठी 12 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आपोआपच शालेय साहित्य महाग झाले असल्याने पालक मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे शालेय साहित्य महाग झाले असताना मुलांसाठी लावण्यात येणार्‍या कोचिंग क्लासचा आर्थिक बोजादेखील पालकांवर वाढत चालला आहे. सध्या पाठ्यपुस्तकांवर जीएसटी नसला तरी 18 जुलैपासून नव्या आकारणीनुसार, छपाई, शाई, चित्रकलेचे साहित्य, पेन्सिल, ब्लेड, शार्पनर यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांंवर वाढविला आहे. नकाशे, तक्ते, पृथ्वीचा गोल यावर पूर्वी जीएसटी नव्हता. आता तो बारा टक्के असणार आहे. शिक्षण संस्थांनी करार पद्धतीने घेतलेल्या सेवांवर पूर्वी बारा टक्कके जीएसटी होता. आता तो 18 टक्के केला आहे. त्याचा बोजा पालकांवरच पडत आहे.

कोचिंग क्लास झाले अनिवार्य
बालवाडीपासून ते सर्व प्रकारच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा यासाठी शाळेबरोबरच कोचिंग क्लास सध्या अनिवार्य होत चालले आहे. शाळेतील अभ्यासामुळे मुले हुशार होतील, अशी खात्री पालकांना वाटेनाशी झाली आहे. तर, कधी शाळेत कच्ची राहणारी मुले क्लास लावल्यानंतर पक्की होतील, असा समज पालकांमध्ये आहे. त्यामुळे मुलांना क्लास लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कोचिंग क्लासवर 18 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे क्लासचे शुल्क वाढले आहे. पर्यायाने, त्यासाठी पालकांना कराव्या लागणार्‍या खर्चात वाढ झाली आहे.

खासगी शाळांकडून लूट
खासगी शाळांकडून पालकांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य घेण्याबाबत बंधन घातले जाते. शाळा खासगी व्हेंडरमार्फत हे शालेय सहित्य घेऊन पालकांना विकत आहेत. पालकांना शालेय सहित्याची विक्री करताना मनमानी पद्धतीने शुल्क वसुली केली जाते. या माध्यमातून शाळा आर्थिक लूट करत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.

शाळेतूनच शालेय साहित्य घेण्याबाबत खासगी शाळा बंधन घालतात. त्या माध्यमातून मनमानी पद्धतीने पालकांकडून शुल्क आकारतात. शासनाने त्याला प्रतिबंध करायला हवा. त्याचप्रमाणे शालेय साहित्यांवरील जीएसटी हटवायला हवा. तसेच, खासगी क्लासकडून करण्यात येणार्‍या शुल्कवाढीवर अंकुश ठेवला पाहिजे.
                                                       – हेमंत मोरे, शहराध्यक्ष, आरटीई पालक संघ

शालेय साहित्य दर (रुपयात)
जंबो वही 40
फुलस्केप वही (172 पानी) 50
एफोरसाईज वही (172 पानी) 60
बॉक्स फाईल 60
बॉलपेन/जेलपेन 5 ते 100

 

Back to top button