देऊळगाव राजे परिसरात दमदार पाऊस | पुढारी

देऊळगाव राजे परिसरात दमदार पाऊस

देऊळगाव राजे; पुढारी वृत्तसेवा: सोमवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. देऊळगाव राजे येथील पर्जन्यमापकावर 41 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत या ठिकाणी जवळपास 300 मिलिमीटर पाऊस पडला. देऊळगाव राजेसह, आलेगाव, बोरीबेल, काळेवाडी, हिंगणी, वडगाव, पेडगाव, शिरापूर या गावांत जोरदार पाऊस झाला. या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस झाला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे परिसरातील बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.

परिसराला वरदान असलेले उजनी धरण 100 टक्के भरले आहे, परंतु या पावसामुळे परिसरात यंदा उसाला पर्यायी पीक म्हणून कपाशी लागवड शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे. परंतु रात्रीच्या पावसाने बरेच पीक वाया जाणार आहे. तसेच चारा पिके, भाजीपाला तरकारी पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा, लहान ऊस यांचेदेखील नुकसान झाले आहे. परिसरातील पिके जलमय झाली आहेत. ओढे, नाले 15 तास झाले तरी वाहत आहेत. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी समस्त शेतकरी वर्गातून होत आहे.

पर्जन्यमापकावरील नोंद चुकीची
देऊळगाव राजे येथे परिसरातील महसूल विभागामार्फत पर्जन्यमापक बसवले आहे, पण रात्री मुसळधार पाऊस होऊनदेखील त्यावर फक्त 41 मिलिमीटर नोंद आहे. त्यामुळे ही नोंद साफ चुकीची आहे, असे मत जाणकार शेतकर्‍यांनी व्यक्त केले.

Back to top button