ग्रामपंचायतीच्या सभेतच मारामारी; लोणी देवकर येथील प्रकार | पुढारी

ग्रामपंचायतीच्या सभेतच मारामारी; लोणी देवकर येथील प्रकार

वरकुटे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा: पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे महत्त्व प्राप्त झालेल्या लोणी देवकर (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये तुफान राड्यासह फ्री -स्टाइल मारामारी झाली. कोण कोणाला कशासाठी मारत आहे कळायला मार्ग नव्हता. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या गावातील नेत्यांनादेखील यामध्ये धक्काबुक्की झाल्याने गावामध्ये तणावाचे वातावरण होते.

दि. 26 ऑगस्ट रोजी गणपूर्तीअभावी तहकूब झालेली ग्रामसभा मंगळवारी (दि. 6) ग्रामपंचायत कार्यालया शेजारील महादेव मंदिरामध्ये सरपंच कालिदास देवकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता चालू होती. सुरुवातीला शांततेत झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करण्यात आला. त्यानंतर ग्रामसेवक बनसोडे यांनी पुढील वर्षीच्या ग्रामविकासाचा आराखडा वाचून दाखवत होते. त्यावेळी गावातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली. विकासाच्या मुद्द्यावर ग्रामस्थ हमारीतुमरीवर आले. त्यातून जोरात मारामारी झाली.

गावातील प्रतिष्ठित नेत्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना देखील यामध्ये धक्काबुक्की झाली. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामधून मनसोक्त झालेल्या मारमारीनंतर कोणतीही तक्रार कोणत्याही गटांनी केली नाही. इंदापूर पोलिस ठाण्यात याची माहिती मिळताच पोलिसांनी लोणी देवकर येथे भेट दिली. पोलिस येताच गावातील वातावरण जणू काही घडलेच नाही असे झाले.

Back to top button