पिंपरखेड : बिबट्यांचे दिवसा समूहाने दर्शन; रानात जनावरे चारणेही बंद

पिंपरखेड : बिबट्यांचे दिवसा समूहाने दर्शन; रानात जनावरे चारणेही बंद
Published on
Updated on

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून पूर्वी एकटा फिरणारे बिबट्यांचे आता दिवसा सामूहिक दर्शन होत आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनामुळे पशुधन धोक्यात आले असतानाच बिबट्या आता माणसावर जीवघेणा हल्ला करू लागला आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी शेतात बिनधास्त फिरणाऱ्या शेतकऱ्यांना आता बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी सोडाच, परंतु दिवसा शेतात फेरफटका मारणे मुश्किल झाल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.

जांबूत आणि पिंपरखेड येथे बिबट्याकडून जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत वाढली आहे. बेट भागासाठी वरदान ठरलेल्या कुकडी व घोडनदीच्या मुबलक पाण्यामुळे पिंपरखेड, काठापूर, जांबुत, चांडोह, फाकटे, वडनेर, टाकळीहाजी, कवठे येमाई, सविंदणे या बेट भागातील गावात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

या उसाच्या लपणचा फायदा उठवत गेले बारा वर्षांपासून या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, गाय, वासरू, घोडी, कुत्रा या प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहे. बिबट्याच्या वारंवार हल्ल्याच्या घटनेने आता अनेक शेतकरी कुत्रा पाळायचे बंद झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्या झाल्याने घटना घडूनही वेळेत पंचनामे होत नाहीत. वनविभागाकडूनही गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्ल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडून पाळीव प्राणी पाळण्याच्या संख्येत घट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी एकटा वावरणारा बिबट्या सामूहिकपणेे लोकवस्तीत येण्याचे धाडस करत असल्याने शेतकरी व नागरिक भयभीत अवस्थेत बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहेत. अनेक वेळा जीव मुठीत धरून शेेेेतात पिकांना पाणी देताना अचानक समोर बिबट्याच्या दर्शनाने काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा अनुभव अनेक शेतकर्‍यांना आला आहे.

वनविभागाकडून काही संस्थांच्या माध्यमातून या बिबटप्रवण क्षेत्रात अनेक वेळा कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. त्यानंतर आजपर्यंत येथील बिबट्यांची संख्या आणि हल्ले दिवसेंदिवस वाढतच गेले आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याच्या वाढत्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याने वनविभागाने या परिसरात नव्याने सर्वेक्षण करून विशेषतः बिबट्यांची गणना करणे गरजेचे आहे. बिबट्याच्या हल्ल्यात नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून नुकसानभरपाईची मलमपट्टी, तसेच बिबट जनजागृती, मोकळे पिंजरे लावणे यापलीकडे बिबटमुक्त परिसर करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

उसाच्या पिकावर ताबा
मोठ्या प्रमाणात वाढलेले उसाचे क्षेत्रालाच बिबट्याने जंगल समजून ताबा घेतल्याने बिबट्याची वाढती संख्या लक्षात घेता शेतकर्‍यांसाठी उसाचे नगदी पीक भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

दिवसा विजेची मागणी वार्‍यावर
ग्रामीण भागात शेतीपंपासाठी दिवसा तसेच रात्रीचा वीजपुरवठा असल्याने बिबट्याची भीती असूनही शेतकर्‍यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत असून शेतीपंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी वार्‍यावर असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

शालेय मुलांमध्ये भीती
शाळेतील लहान मुलांना रस्त्याने जाताना दोन्ही बाजूने असलेल्या उसाच्या शेतामुळे बिबट्याच्या भीतीने जीव मुठीत धरून घर ते शाळा असा प्रवास करावा लागतो. वाड्या-वस्त्यांवरील अनेक प्राथमिक शाळांना लागूनच उसाचे शेत असल्याने शाळा परिसरातही बिबट्यांचा वावर असल्याने पालकांमध्येही बिबट्याची प्रचंड भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news