शिवगंगा खोर्‍यात आठवड्याचे सर्वच दिवस गुरुवार? सणासुदीलाही वीज गायब | पुढारी

शिवगंगा खोर्‍यात आठवड्याचे सर्वच दिवस गुरुवार? सणासुदीलाही वीज गायब

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: शिवगंगा खोर्‍यात पूर्वी आठवड्यातील गुरुवारी सकाळ ते संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित असायचा. गुरुवार सोडला तर इतर दिवशी क्वचितच काही मिनिटे वीज खंडित होत असे. सध्याची परिस्थिती पहिली तर महावितरणच्या कारभारामुळे आठवड्यातील सर्वच दिवस गुरुवार असल्याचे निदर्शनास येत असून व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ऐन गणेशोत्सवात विजेच्या लपंडावाने स्थानिक नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

गेल्या एक-दोन वर्षांपूर्वी शिवगंगा खोर्‍यात गुरुवारच्या दिवशी वीज खंडित होत असे, त्यामुळे परिसरातील कंपन्यांना सुट्टी असायची, तसेच इतर व्यावसायिकांनासुद्धा याची कल्पना होती. या सर्व बाबी लक्षात घेता, गुरुवार म्हणजे वीज खंडित असे, परंतु आता महावितरणची परिस्थिती बदलली किंबहुना बिघडली असून रोजच सुमारे किमान दहा वेळा वीज खंडित होत असून स्थानिकांसह व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

वीजबिल वेळेवर भरले नाही तर महावितरण लगेचच वीजपुरवठा खंडित करते. पण, आम्ही वेळेवर वीजबिल भरूनही विजेचा सामना करावा लागत आहे. महिनाभरात सुमारे एक लाख रुपये डिझेलसाठी लागत आहेत. वेळेवर वीजबिल भरूनही असे हाल होत असतील तर व्यवसाय बंद करावा लागेल, असे येथील एका हॉटेल व्यावसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

सध्या डीपीचे बॉक्स बसविणे सुरू आहे. लवकरच ते बसविण्यात येणार असून सोमवारनंतर काही अडचण येणार नाही.
                                                                 नवनाथ घाटोळे,
                                                अभियंता, नसरापूर विभाग महावितरण.

Back to top button