पीक नुकसानीचे पंचनामे करा; वनपुरी सोसायटीच्या उपाध्यक्षांची मागणी | पुढारी

पीक नुकसानीचे पंचनामे करा; वनपुरी सोसायटीच्या उपाध्यक्षांची मागणी

दिवे; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यात या वर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला असून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यातूनही शेतकर्‍यांनी धडपड करून पिके घेतली, परंतु जास्त पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. बाजरी, भुईमूग, वाटाणा, घेवडा यांसह तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वनपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षा भारती सुनील गायकवाड यांनी मागणी केली आहे.

पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाटाणा या पिकासह सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. मागील दोन दिवसांत झालेल्या जोराच्या पावसाने राहिलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत. कशीबशी आलेली बाजरी, घेवडा, भुईमूग, शेतात आताच टाकलेली कांद्याची रोपे नष्ट झाली आहेत. फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. एकूणच यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असून शासनाने नुकसानीची तातडीने दखल घेण्याची मागणी भारती गायकवाड यांनी केली आहे.

Back to top button