पुणे : निंबोडीच्या ग्रामसभेत अस्तरीकरणाविरोधात ठराव | पुढारी

पुणे : निंबोडीच्या ग्रामसभेत अस्तरीकरणाविरोधात ठराव

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा : निंबोडी (ता. इंदापूर)च्या ग्रामसभेत निरा डावा कालवा अस्तरीकरणाच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव कालवा अस्तरीकरण विरोधी समितीकडे सुपूर्द करण्यात आला.

कालवा अस्तरीकरणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी निंबोडी (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. 28) ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सतीश काटे, पांडुरंग कचरे, बाळासाहेब शिंदे, नारायण घोळवे, मनोज घोळवे, सर्जेराव घोळवे, किसन घोळवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

नीरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम जोपर्यंत बंद करण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. काही राजकीय नेते शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. कालव्या जवळच्या भागात आले की अस्तरीकरणाला पाठिंबा व नदीकडील भागात गेले की अस्तरीकरणाला विरोध, अशी दुटप्पी भूमिका काही नेते घेत आहेत.

कालव्याचे अस्तरीकरण करण्यापेक्षा नीरा नदीला येणारे कारखान्यांचे प्रदूषित पाणी नेत्यांनी बंद करावे. बारामती शहरामध्ये कालव्याचे अस्तरीकरण झाल्यानंतर सध्या पावसाळा सुरू असूनही अनेक विंधन विहिरी बंद पडल्या आहेत. अस्तरीकरण झाल्यानंतर कालव्याचा पाझर बंद झाल्याने विहिरी कोरड्या पडून शेतकर्‍यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कालव्याच्या अस्तरीकरणाची संकल्पना पूर्णपणे चुकीची असल्याने शेतकरी, मजुरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अस्तरीकरण विरोधी समितीच्या भूमिकेवर या वेळी चर्चा करण्यात आली.

Back to top button