ठेकेदारांची बिले ईसीएसद्वारे मिळणार | पुढारी

ठेकेदारांची बिले ईसीएसद्वारे मिळणार

पिंपरी : महापालिकेसाठी काम करणारे ठेकेदार, वस्तू अथवा सेवा पुरवठादार यांची बिले यापुढे केवळ इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा (ई.सी.एस.) या प्रणालीद्वारे दिली जाणार आहेत. तसे पालिकेच्या सर्व विभागांना बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक लेखा विभागाने काढले आहे. लेखा विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यासाठी पालिकेच्या वतीने ई.सी.एस. सुविधा प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे.

याद्वारे उपभोक्त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. मात्र, काही विभागांकडून पाटबंधारे विभाग, महावितरण, एआयडीसी, पाणी बिले, बीएसएनएल यांची बिले धनादेशाद्वारे देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही बिलांची अदायगी करण्यासाठी आता ई.सी.एस. प्रणालीचा वापर करणे सर्व विभागांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, यापुढे लेखा विभागाकडून कोणत्याही कंत्राटदार, वस्तू अथवा सेवा पुरवठादार यांच्या बिलांची धनादेशाद्वारे अदायगी करण्यात येणार नाही. पालिकेच्या ज्या विभागांकडून बिले धनादेशाद्वारे देण्यात येतात, अशा सर्व विभागांनी कंत्राटदार, वस्तू व सेवा पुरवठादार यांची ई.सी.एस. नोंदणी करून घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

इंधनासाठी प्रीपेड पेट्रो कार्ड
महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच, विविध विभागांसाठी लागणार्‍या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक व रोख विरहित करण्यासाठी ‘प्रीपेड पेट्रो कार्ड’ लेखा विभागामार्फत सर्व विभागांना यापूर्वीच देण्यात आले आहे. त्याचा वापर सर्व विभागांच्या वाहनात इंधन भरण्यासाठी करण्यात येत आहे. यामुळे पालिकेचे आर्थिक व्यवहार रोख विरहित केले जात आहेत.

Back to top button