शनिवार ठरला खरेदीचा वार! ‘सजावटी’चा बाजार फुलला | पुढारी

शनिवार ठरला खरेदीचा वार! ‘सजावटी’चा बाजार फुलला

पुणे : गौरी-गणपतीसाठीच्या वस्तूंसाठी महिला-युवतींनी रविवार पेठ, तुळशीबागेत केलेल्या गर्दीचे वातावरण शनिवारी बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाले. कोणी गणेशमूर्तीच्या खरेदीत, तर कोणी पूजेच्या साहित्यांच्या खरेदीत व्यग्र होते. महिला-युवतींनी गौरी-गणपतीच्या खरेदीचे निमित्त साधत सुटीचा दिवस सत्कारणी लावला. सायंकाळी चारनंतर बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. लोकांमध्ये कमालीचा उत्साह, आनंद होता. मात्र, गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. मंडई, रविवार पेठ, कसबा पेठ, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता यासह ठिकठिकाणी पूजेच्या साहित्यांपासून ते कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी दिसली.

इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये विद्युत रोषणाईच्या माळांच्या खरेदीसाठी, तर कसबा पेठेतील स्टॉल्सवर गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी गर्दी झाली. अप्पा बळवंत चौक, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, मंडईच्या आतील परिसर आदी ठिकाणी यामुळे वाहतूक कोंडीही झाली. शनिवार असल्याने सहकुटुंब खरेदीचे निमित्त पुणेकरांनी साधले. मिठाई खरेदीसह श्रीगणेशासाठी आभूषणे, मुकुटाच्या खरेदीला लोकांनी प्राधान्य दिले. बोहरी आळी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर आणि मध्यवर्ती पेठांमध्ये असलेल्या स्टॉल्सवरही गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी लगबग दिसली.

मध्य भागात वाहतूक कोंडी
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मंडई, तुळशीबाग परिसरात शनिवारी (दि. 27) गर्दी झाली. शहर तसेच उपनगरातून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी आल्याने मध्य भागात वाहतूक कोंडी झाली. सदाशिव पेठ, नारायण पेठेतील गल्लीबोळात बेशिस्तपणे दुचाकी लावण्यात आल्याने गल्लीबोळातील वाहतूक विस्कळीत झाली. कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

पोलिसांकडून मॉकड्रिल
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात घातपातविरोधी तपासणी केली. मंदिर परिसरात दोन दहशतवादी शिरले असून, त्यांनी काही लोकांना वेठीस धरले असून, त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू असल्याचा कॉल पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार तत्काळ पोलिसांचे शीघ्र कृती दल,बाँब शोधक- नाशक पथक, विश्रामबाग, फरासखाना पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. अचानक मोठा फौज फाटा दाखल झाल्याने नागरिकांना काही तरी घडल्याची चाहूल लागली होती. मात्र, मॉकड्रिल असल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांनी रंगीत तालीम केली. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक शनिवारी दुपारी काही काळ विस्कळीत झाली.

Back to top button