पुणे : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; जिल्हा परिषदेत नोकरी लावतो सांगून गंडा | पुढारी

पुणे : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; जिल्हा परिषदेत नोकरी लावतो सांगून गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या आमिषाने सात जणांना तब्बल 18 लाख 13 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घालणार्‍या एका माजी सैनिकाला विमानतळ पोलिसांकडून अटक करण्यात आली. जिल्हा परिषदेत परिचर व ड्रायव्हरची नोकरी लावतो असे सांगून त्याने प्रत्येकी अडीच ते तीन लाख रुपये प्रत्येकाडून जमा केले होते. नामदेव कान्हु जायभाये (वय 57, रा. एअरफोर्स स्टेशन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जायभाये हा लष्करातून निवृत्त झाला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई येथील 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार एअरफोर्स चौकात मार्च ते एप्रिल 2013 दरम्यान घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जावई सैन्यदलात आहे. त्यांची सदन कमांड येथे नियुक्ती झाली होती. 2013 मध्ये त्यांची नामदेव जायभाये याच्याशी ओळख झाली. तो तेव्हा एअरफोर्स ईटेंलिजन्स स्कूल येथे काम करीत होता. जायभाये याच्या ओळखीने मुलांना नोकरी लावतो, असे त्यांना समजले. त्याने फिर्यादी यांना पुणे जिल्हा परिषदेत परिचर, ड्रायव्हर व इतर जागा निघाल्या आहेत, त्यासाठी कागदपत्र आणून दिल्यास ड्रायव्हरसाठी अडीच लाख, परिचरसाठी 3 लाख घेत असल्याचे सांगितले.

त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा व इतर 6 नातेवाईकांना नोकरी लावण्यासाठी असे एकूण 19 लाख 50 हजार रुपये जायभाये याच्या हवाली केले. मात्र, पैसे देऊनदेखील नोकरी लागत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले, तेव्हा जायभाये याने 19 लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, खात्यावर पैसे नसल्याने तो परत आला. त्यांनी सातत्याने विचारणा केल्यावर त्याने 1 लाख 37 हजार रुपये परत केले. मात्र, उरलेले पैसे परत केले नाहीत. त्यांनी पुन्हा पुन्हा विचारणा केल्यावर त्याने बाँड पेपरवर 3 महिन्यांत हातउसने घेतलेले पैसे परत करतो, असे लिहून दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना त्याला दारू पाजून चेक घेतले आहेत. दारू पाजून बाँड लिहून घेतला, अशी नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्यादी दिली असून सहायक पोलिस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

 

Back to top button