हवाला रॅकेटचा ‘महामार्ग’; पुणे-सोलापूर मार्गावरील साडेतीन कोटींच्या लुटीनंतर उलटसुलट चर्चा | पुढारी

हवाला रॅकेटचा ‘महामार्ग’; पुणे-सोलापूर मार्गावरील साडेतीन कोटींच्या लुटीनंतर उलटसुलट चर्चा

जावेद मुलाणी

इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे गोळीबार करून लुटलेली 3 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम हवाला रॅकेटची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या महामार्गावरून गुटख्याच्या अवैध वाहतुकीनंतर आता हवाला रॅकेट सुरू असलेल्या शक्यतेला दुजोरा मिळत आहे. या महामार्गावरून नेहमीच अवैध वाहतूक होत असल्याने पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. या लुटूपुटू कारवाया करण्यात पोलिस प्रशासन व्यस्त असून, कोट्यवधी रुपयांचे हवाला रॅकेट मस्त सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतून मुंबईकडे हवाला रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जात असल्याचे बोलले जात आहे. ऑगस्ट 2021 मध्ये देखील याच महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथे एसटी बसमधून लाखो रुपये लूट केल्याची घटना घडली होती. त्या वेळी देखील ते पैसे हवालामार्फत चालले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. 26) गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटल्याने ही दुसरी घटना समोर आली आहे. ज्या वेळेस असे लूटमारीचे प्रकार घडतात, तेव्हाच अशा घटना समोर येतात, इतर वेळेस मात्र हवाला रॅकेट सुरू असल्याचे कोणतेही धागेदोरे किंवा खबर पोलिसांना मिळत नाही.

इंदापूर येथे गोळीबार करून लुटलेली रक्कम नेमकी कोणाची आहे? ती कुठून कुठे चालली होती? दरोडेखोर कोणत्या दिशेने फरार झाले? याबाबतचा तपास इंदापूर पोलिसांची सात पथके करत असून, पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. या घटनेवर ते बारकाईने लक्ष देऊन तपासाची चक्रे गतिमान करण्यासाठी सूचना
करत आहेत.

हवाला म्हणजे काय?
बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. काळा पैसा म्हणजेच कर चुकवून जमा केलेली माया एका भागातून दुसर्‍या भागात पोहोचवायचे. त्यासाठी बँकांची गरज नाही किंवा करन्सी एक्स्चेंजचीही गरज नाही. कुठला फॉर्म भरायला नको की शुल्कही लागणार नाही. गरज असते ती केवळ पैसे पाठवणारा, पैसे स्वीकारणारा आणि दोन मध्यस्थ यांची. यालाच ‘हवाला’ असे म्हणतात.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीने तपास कार्यासाठी सात पथके 24 तास तैनात केली असून, तपास कार्य वेगाने सुरू आहे. लवकरच या घटनेचे धागेद्वारे हाती लागतील.

                                   – प्रभाकर मोरे, प्रभारी पोलिस निरीक्षक, इंदापूर

सदर घटनेतील रक्कम ही अंगडिया सेवेची होती. फिर्यादीने घटना घडल्यानंतर तब्बल आठ तासाने फिर्याद दिल्यामुळे जिल्ह्यात व जिल्हयाबाहेर नाकाबंदी करता आली नाही. त्यामुळे आरोपी पलायन करण्यात यशस्वी झाले. मात्र, तपास यंत्रणांच्या माध्यमातून आरोपींचे धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न जलद गतीने सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळी तपास पथके तैनात केली आहेत.

                          – गणेश इंगळे , उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

Back to top button