चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार? राष्ट्रीय महामार्गावर विविध उपाययोजना राबविणार | पुढारी

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार? राष्ट्रीय महामार्गावर विविध उपाययोजना राबविणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकात सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोडींचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही गुरुवारी बसला आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चांदणी चौक परिसराला भेट दिली. त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले आदी उपस्थित होते.चांदणी चौकात सुरू असलेल्या कामामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते. त्याचा फटका थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी बसला.

त्यानंतर आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. शिंदे यांनी संबंधित सर्व आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना या ठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीची पाहणी करून प्रवाशांची समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते. पश्चिमेकडून येणार्‍या 9 लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. हे लक्षात घेऊन बैठकीत लेनची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश विक्रमकुमार आणि डॉ. देशमुख यांनी दिले. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांकडून प्रत्येकी 50 असे एकूण 100 मार्शल वाहतूक नियंत्रणासाठी नेमण्यात येणार आहेत.

चांदणी चौकातील पूल नियंत्रित ब्लास्टिंग पद्धतीने 15 दिवसांत पाडण्यात येईल. त्यानंतर त्वरित नवीन लेन सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी पुलाजवळील पाणी पुरवठ्याच्या वाहिनीला पर्यायी वाहिनीचे काम करण्यात येईल. वेधशाळेच्या जागेविषयी पुणे महानगरपालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नेमून स्थगिती आदेश रद्द करण्याविषयी विनंती करण्यात येईल, जेणेकरून सर्व्हिस लेनसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1 सप्टेंबरनंतर श्रृंगेरी मठ परिसरातील 548 चौरस मीटरपैकी 270 चौरस मीटर ताबा मिळणार असल्याने सर्व्हिस रोड सुरू होण्यास मदत होणार आहे.

जडवाहतुकीला नियंत्रित केले जाणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात येणार्‍या जडवाहतुकीला 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या कालावधीत दोन्ही पोलिस आयुक्तालयाच्या सीमेवर नियंत्रित करण्यात येणार आहे. जेणेकरून शहरातील वाहतुकीवरील ताण दूर होण्यास मदत होईल.

रस्त्यावरील खड्डे दोन दिवसांत बुजवणार
मुळशी ते सातारा मार्गावरील चांदणी चौकातील डांबरीकरणाचे काम पुढील 7 दिवसांत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. यामुळे पुणे शहरातील वाहतुकीवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. वेधशाळेच्या समोरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधितांशी चर्चा करून 4 दिवसांत दुरुस्तीचे काम करण्यात येईल. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम 2 दोन दिवसांत करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Back to top button