लोणीत आठ लाखांचा ऐवज चोरला | पुढारी

लोणीत आठ लाखांचा ऐवज चोरला

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : लोणी (ता. आंबेगाव) येथील पैसावस्तीत घराचा लोखंडी दरवाजा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण 8 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. विवेक सुभाष वाळुंज यांच्या घरी मंगळवारी (दि.23) रात्री 12 ते 2 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. श्रीराम काशिनाथ वाळुंज (वय 24, रा. खडकवाडी ता. आंबेगाव) यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विवेक वाळुंज व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त मुंबई येथे राहत आहे. गावी त्यांचा बंगला आहे.

बुधवारी (दि. 17) ते वडिलांच्या महिना श्राद्ध कार्यक्रमासाठी गावी आले होते. त्यानंतर शनिवारी (दि.20) रोजी ते पुन्हा मुंबईला गेले होते. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याचा फायदा घेतला. गावातील घराची जबाबदारी चुलत बंधू श्रीराम वाळुंज हे पाहत होते. श्रीराम वाळुंज यांना बुधवारी (दि. 24) विवेक वाळुंज याने फोन करून सांगितले की, मला गावावरून अक्षय वाळुंज यांनी फोन आला आहे. बंगल्याचे टेरेसवरील दरवाजा व घराचा दरवाजा उघडा आहे.

त्यानंतर श्रीराम वाळुंज फिर्यादी यांनी बंगल्यात जाऊन पाहिले असता चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून देवघरातील लोखंडी व लाकडी कपाटाचे लॉकर तोडून घरात चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात असलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, बांगड्या, अंगठ्या व रोख रक्कम 52 हजार रुपये रक्कम, असा एकूण 8 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे श्रीराम वाळुंज यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. चोरी करताना तीन चोरटे सीसीटीव्ही कॉमेर्‍यात कैद झाले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे तपास करत आहे.

Back to top button