राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा अरुणाचलमध्ये डंका; जिंकल्या ३ जागा

Ajit Pawar, NCP
Ajit Pawar, NCP

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अरुणाचल प्रदेशात १४ जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी तीन जागांवर अजित पवार गटाला यश मिळाले आणि १० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. तर अन्य ३ जागांवर अजित पवार गटाचा निसटता पराभव झाला.

निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निकाल दिल्यानंतर महाराष्ट्र राज्याबाहेर पहिल्यांदा अजित पवार गटाला विजय मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गोटात उत्साह आहे. अरुणाचल प्रदेशात निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये लिखा सोनी, निख कामीन, टोकू टातुंग यांचा समावेश आहे. अजित पवार गटाच्या या यशामुळे पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळू शकतो. महाराष्ट्रासह नागालँड, झारखंड आणि आता अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) लोकप्रतिनिधी, आमदार आहेत.

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, प्रभारी सुबोध मोहिते पाटील, समन्वयक संजय प्रजापती, प्रदेशाध्यक्ष लिखा साया यांनी मेहनत घेतली होती.

राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल – प्रफुल पटेल

 अरुणाचल प्रदेशातील या यशानंतर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी एक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रफुल पटेल म्हणाले की, "अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३ विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. तर १० टक्के पेक्षा जास्त मते मिळवली आहेत. हे यश पक्षाचा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठी आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news