पुणे : यंदा पर्यावरणपूरक नानाविध प्रकारच्या मखरांवर भर! | पुढारी

पुणे : यंदा पर्यावरणपूरक नानाविध प्रकारच्या मखरांवर भर!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती अन् अष्टविनायक थीमवरील मखरे… अशी नानाविध मखरे बाजारात आली आहेत. यंदा मखर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कागदी पुठ्ठ्यांपासून ते ग्रीन शीटपासून तयार केलेले पर्यावरणपूरक मखर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. गणेशोत्सव सजावटीतला महत्त्वाचा भाग म्हणजे मखर खरेदी… दरवर्षी नावीन्यपूर्ण आणि विविधांगी डिझाईनचे मखर बाजारात येतात…यंदा वेगवेगळ्या थीमवरील मखर बाजारात आले आहेत…थर्मकोलच्या मखरला बंदी असल्याने सध्या पर्यावरणपूरक मखर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

घरगुती गणपतीसाठी पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात मखर खरेदी होत आहे. सध्या बाजारात शनिवारवाडा, काल्पनिक मंदिर, कमळ आणि विविध आसनातील मखर आले आहेत. वेगवेगळ्या रंगसंगती आणि डिझाईन्स वापरून कागदाच्या पुठ्ठ्यांचे मखर तयार करण्यात आले आहेत. रविवार पेठेसह शहरातील विविध मखर विक्रीच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. मखरांसह रंगीबेरंगी पडदे आणि कागदही दालनांमध्ये उपलब्ध आहेत.

व्यावसायिक अभिजित बांगड म्हणाले, ‘पर्यावरणपूरक मखर दालनात असून, यंदा मखर खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळांवर आधारित…रंगीबेरंगी कागदांनी, मोत्यांनी अन् कापडांनी सजविलेले मखर लक्ष वेधून घेत आहेत. यंदा मखरांची किंमत वाढलेली नाही. गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरल्याने लोक मखर खरेदी करत आहेत.’

मखरांचे वैविध्यपूर्ण प्रकार ठरताहेत लक्षवेधी
पर्यावरणपूरक मखर बाजारात आले आहेत. त्यातील नानाविध प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. मंदिरांच्या प्रतिकृतीपासून ते वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित मखर बाजारात उपलब्ध आहेत. मयुरासन, सिंहासन, सूर्यासन, झूलासन यासह अष्टविनायक, ओम मखर असे प्रकारही आहेत, तर मयुरासन विथ एलईडी लाईट या प्रकारालाही लोकांकडून मागणी आहे. तर जंगल थीमवरील मखरही लक्षवेधी ठरत आहे. राजमुद्रासन यासह शनिवारवाड्याची प्रतिकृती असलेले मखर पाहायला मिळतील. केदारनाथ मंदिर, पालखी सोहळ्यावर आधारित मखर, वेगवेगळ्या पडद्यांपासून तयार केलेले मखरही उपलब्ध आहेत.

Back to top button