पुणे जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा दुप्पट; खरिपाच्या एकूण पेरण्या 97 टक्क्यांवर | पुढारी

पुणे जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा दुप्पट; खरिपाच्या एकूण पेरण्या 97 टक्क्यांवर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्याचे खरीप हंगामात तुरीचा 44 टक्के, मुगाची 58 टक्के आणि भुईमुगाचा जेमतेम 43 टक्केच पेरा पूर्ण झाला आहे. चालू वर्षी जून महिन्यात पावसाने हजेरी न लावल्याने पेरण्या उशिरा झाल्याने ही स्थिती दिसून येत आहे, तर खरिपाच्या एकूण 97 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर, भात लावण्यांखालील क्षेत्र वाढले असून, सोयाबीनचा दुपटीहून अधिक पेरा झाल्याची माहिता अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 1 लाख 95 हजार 710 हेक्टरइतके असून, प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार 692 हेक्टरवरील म्हणजे 97 टक्के क्षेत्रावरील पेरा पूर्ण झाला आहे. जून महिन्यात पावसाची सर्वदूर अपेक्षित हजेरी नव्हती. त्यामुळे या महिन्यात पेरा होणारा तूर, मूग, उडदाच्या पेरणीचा मुख्य कालावधी वाया गेला. त्याचा परिणाम म्हणून पेरणी क्षेत्र कमी झालेले आहे. मात्र, सोयाबीन, मका क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. मक्याला मिळत असलेला चांगला दर आणि जनावरांच्या चार्‍यासाठी होत असलेला उपयोग म्हणून शेतकरी मका लागवडीसही प्राधान्य देत आहे. तर, दर चांगले असल्यामुळे सोयाबीनचा पेरा 44 हजार 692 हेक्टर म्हणजे सरासरीच्या 213 टक्के क्षेत्रावर विक्रमी पेरणी पूर्ण झाली आहे.

पावसाने उशिरा का र्होइना दमदार हजेरी लावली आणि भात लावण्यांना पोषक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भात लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदर तालुक्यात मिळून भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 59 हजार 627 हेक्टरइतके आहे. त्यापैकी 23 ऑगस्टच्या ताज्या अहवालानुसार 56 हजार 176 हेक्टरइतक्या क्षेत्रावरील भात लागवडी पूर्ण झाल्या आहेत.

पेरणी क्षेत्राची आकडेवारी हेक्टरमध्ये टक्केवारीसह
हवेली 4182 – 85 टक्के, मुळशी 8104 95 टक्के, भोर 13976, 80, मावळ 10959 , 84, वेल्हे 5834, 99 टक्के, जुन्नर 29681, 100 टक्के, खेड 25871, 111 टक्के, आंबेगाव 15545, 97 टक्के, शिरूर 23386, 69 टक्के, बारामती 17804, 162 टक्के, इंदापूर 13570,161 टक्के, दौंड 4955, 113 टक्के, पुरंदर 16826, 88 टक्के

प्रमुख पिकांचे सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी पुढीलप्रमाणे
भात : 59627, 56176, 94 टक्के, बाजरी 47518, 35026, 74 टक्के, मका 18828, 25083,133 टक्के, तूर 2033, 903, 44 टक्के, मूग 14961, 8730, 58 टक्के, उडीद 1715, 1427, 83 टक्के, भुईमूग शेंग 15432- 6647, 43 टक्के, सोयाबीन 20982, 44692, 213 टक्के.

Back to top button