पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी बसचालक आणि एका चारचाकीचालकाचा वाद झाल्याची घटना नुकतीच फर्ग्युसन रस्त्यावर घडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा घटना सातत्याने घडत असून, त्या थांबविण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. पीएमपी आणि इतर वाहनचालकांचे रस्त्यावर वाद झाले नाहीत, असा दिवस उजाडलेला नाही. दररोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर, चौकामध्ये पीएमपी बसचालक आणि इतर वाहनचालकांचे वाद हे होताना दिसतातच.
हे वाद अनेकदा हाणामारीपर्यंत जातात, दोन्ही वाहनचालकांची डोकी फुटतात, रक्त वाहते. पोलिसांत गुन्हे दाखल होतात. यात चुकी कोणाची, यावरून शहरातील पोलिस ठाणी आणि चौक्यांमध्येच बसमधील प्रवाशांना घेऊन अनेकदा न्यायालयच भरते.
कधी चुकी बसचालकाची असते, तर कधी वाहनचालकाची. मात्र, अशा घटना पीएमपी बसचालकांकडूनच सातत्याने होत असल्याचे समोर आले आहे. त्यातही हे बसचालक सर्वाधिक पीएमपीच्या ठेकेदारांकडील असल्याचे अनेकदा दिसते.
ठेकेदारांकडील चालक हे अनेकदा पगारांवरून, सोयी-सुविधा मिळत नसल्याने संप करताना दिसतात. ते कायम नाराज असतात. या चालकांनी पगारवाढीसाठी मागे एकदा मोठा संप पुकारून पीएमपीची सेवा ठप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी मेस्मा लावून संप दडपून टाकला. अन् अशाप्रकारे संप पुन्हा होऊ नये, याकरिता पीएमपीच्या स्वमालकीच्या चालकांना ई-बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे ठेकेदारांच्या चालकांचे संपाचे शस्त्रदेखील निकामी झाले. यामुळे पगारवाढीचा प्रश्न तसाच राहिला. परिणामी, त्यांची घरसंसार चालवताना मोठी ओढाताण होत आहे. त्यांची मानसिक स्थिती बिघडत असून, याचा कुठेतरी राग गाडी चालवताना निघून, अशा प्रकारच्या वादावादीच्या घटना घडत असतील का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
हेही वाचा