पुणे : यंदा महिलांचे पथक; ढोल-ताशा, झांज, लेझीम, मर्दानी खेळांसाठी नारीशक्ती सज्ज | पुढारी

पुणे : यंदा महिलांचे पथक; ढोल-ताशा, झांज, लेझीम, मर्दानी खेळांसाठी नारीशक्ती सज्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवात ढोल-ताशांच्या तालावर पुणेकरांना थिरकवायला यंदा महिलांचे ढोल-ताशा पथकही सज्ज झाले आहे. पथकांमध्ये महिला-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग असून, प्रत्येक जण वेळ काढून गणेशोत्सवासाठीच्या सरावाला लागला आहे. पथकांमध्ये झांज, लेझीम आणि मर्दानी खेळांच्या पथकात महिला-युवती दिसणार आहेत. महिलांचे पथक गणेशोत्सवातील दहाही दिवस मंडळांच्या ठिकाणी आणि मिरवणुकीत वादन करणार आहेत. सध्या रोज सायंकाळी दोन तास पथकांचा सराव सुरू असून, 16 ते 70 वयोगटातील
महिला-युवतींचा ढोल-ताशा पथकांसह इतर पथकांमध्ये वादन करताना दिसत आहेत.

त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठानचे विनोद आढाव म्हणाले, ‘आमच्या पथकात मर्दानी खेळांमध्ये युवतींचा सहभाग आहे. त्या सध्या सरावात व्यस्त असून, मोठ्या हिरीरीने आणि आत्मविश्वासाने त्या मर्दानी खेळ सादर करत आहेत. त्या मिरवणुकीत मर्दानी खेळ सादर करणार आहेत.’ मानिनी ढोल-ताशा पथकाच्या स्मिता इंदापूरकर म्हणाल्या, ‘सायंकाळी वेळ काढून महिला-युवती सरावात सहभागी होत आहेत. 16 ते 70 वयोगटातील महिला-युवती पथकात आहेत. ढोल-ताशा वादनाची आवड असल्याने महिला-युवती त्यासाठी वेळ काढत आहेत. त्यांच्यात एक जोश आणि जल्लोष पाहायला मिळत आहेत. वादनात त्या रमून जात असून, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सर्व जणी वादन करण्यासाठी सज्ज आहेत.’

ज्ञानप्रबोधिनीचे बर्ची पथक हे पुण्यातले पहिले पथक. त्याचा वारसा आजही चालू ठेवत समाजात चालू असणार्‍या अतिशय खेदजनक गाणी व अशोभनीय नृत्याला एक शिस्तबद्ध पर्याय म्हणून बर्चीनृत्य करतो. आपल्या शारीरिक क्षमता ताणणे, आपल्यातल्या उत्साहाची अनुभूती घेणे आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधिनीने कायम हा पर्याय अवलंबून त्याचा प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न केला आहे.

मागच्या वर्षीची कसर भरून काढत, त्याला नव्या काही बर्ची नृत्यातील प्रकारांची, नव्या प्रयोगांची भर देत यावर्षी सराव करत आहोत. या सगळ्या गटाच्या साथीला ढोल आणि ताशाचे वादन करणारा युवतींचा गटही सराव करत आहे. युवतींनी युवतींसाठी चालवलेल्या या बर्ची पथकात बर्चीनृत्य करणार्‍या 120 प्रशालेय मुली, लेझीम करणार्‍या 40, 80 ढोलवादक, 15 ताशावादक, 25 ध्वजधारी असा युवतींचा गट आहे. यामध्ये 11 वीतील मुलींपासून ते सुमारे 60 वर्षांच्या महिलाही सहभागी आहेत.

                               – प्रज्ञा प्रभुदेसाई-अक्कलकोटकर, युवती संघटन सचिव

Back to top button