पुणे : अस्तरीकरण बेततेय जीवावर! | पुढारी

पुणे : अस्तरीकरण बेततेय जीवावर!

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात मागील दोन वर्षांत निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण झाले, तेव्हापासून कालव्यात पडलेल्या व्यक्तींना स्वतः बाहेर पडणे अथवा इतरांकडून वाचविणे जिकिरीचे बनले आहे. कालवा अस्तरीकरणानंतर अनेकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि. 21) एका नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह कालव्यात आढळल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कालव्याचे अस्तरीकरण जीवावर बेतत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

बारामती शहरातून वाहणार्‍या या कालव्याच्या अस्तरीकरणाचा ठराव बारामती नगरपरिषदेत मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी शहरातील अनेक पक्ष, संघटनांनी अस्तरीकरणाबाबत विरोधीही केला होता. बारामती हा तसा दुष्काळी भाग आहे. निरा डावा कालवा हा पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्याने अस्तरीकरण करू नये. अस्तरीकरणामुळे कालव्याचा पाझर बंद होऊन लगतच्या विहिरी, बोअरवेल कोरड्या पडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती, ती खरी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना याचा अनुभव आला. कालव्यापासून जवळचा भाग समजल्या जाणार्‍या अशोकनगरमध्ये अनेक नागरिकांची बोअरवेल पाण्याअभावी बंद पडले आहेत. कालव्या लगतच्या विहिरींची स्थिती अशीच झाली. कालव्याचे तळापासून व दोन्ही बाजूने अस्तरीकरण होत असल्याने पाणी पाझरण्यासाठी कोणतीही संधी राहात नाही. अस्तरीकरणाचा थर स्लॅबप्रमाणे जाड असतो. त्यातून थेंबभर पाणीसुद्धा पाझरणे शक्य होत नाही. कालवा अस्तरीकरणामुळे विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी झाले, ही स्थिती नाकारता येणार नाही.

अस्तरीकरणामुळे कालव्यात पडलेल्या व्यक्तीला स्वतःहून बाहेर पडणे अथवा इतरांनी मदत करून त्याला बाहेर काढणे हे अशक्य झाले आहे. कालवा अस्तरीकरणाचा हा दुसरा तोटा सध्या दिसून येत आहे. कालव्याच्या दोन्ही बाजू निमुळत्या आहेत. शिवाय तळाचा भागही सिमेंट काँक्रिटचा असल्याने, पाझर बंद झाल्याने पाण्याच्या प्रवाहाची गती कमालीची वाढली आहे. दोन्ही बाजूंना आधारासाठी कोणतीही व्यवस्था राहिलेले नाही. पूर्वी मातीचा भराव असताना कालव्यात अथवा बाजूलाही झाडे-झुडपे वाढली होती. त्याचा आधार बुडत्याला मिळत होता, ती सोय आता उरलेली नाही. दुसरीकडे प्रवाहाची गती कमालीची वाढली आहे. त्यामुळे पट्टीच्या पोहणार्‍यालाही कालव्याबाहेर येणे लवकर शक्य होत नाही. परिणामी पाण्यात बुडून अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

Back to top button